नवी दिल्ली, 25 जानेवारी: केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (Republic Day 2021) सर्वोच्च नागरी सन्मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्राला भूषण वाटेल अशा उद्योगिनीला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. जसवंतीबेन जमनादास पोपट (Jaswantiben Jamnadas Popat) या नावाने कदाचित तुम्ही या उद्योजिकेला ओळखणार नाही. पण तिच्या उत्पादनाची चव चाखली नाही असा भारतीय विरळा! महाराष्ट्रात तर गेल्या दोन पिढ्यांनी याच पापडाची चव जिभेवर कायम ठेवली आहे. महिला गृहउद्योग लिज्जत पापडच्या जसवंतीबेन यांना पद्मश्री जाहीर झाल्यामुळे महिला उद्योगाचाच सन्मान झाला आहे. या लिज्जत पापडची जन्मकथा सुरू झाली 80 रुपयांच्या उधारीपासून. आज 800 कोटींच्या वर उलाढाल असलेला आणि शेकडो गरजू महिलांना रोजगार देणाऱ्या या उद्योगाची आणि जसवंतीबेन यांची ही प्रेरणागाथा महिला गृहउद्योग लिज्जत पापडाच्या निमित्ताने देशासमोर महिला सबलीकरण काय असतं याचं ठळक उदाहरण घालून दिलं आहे. उद्योग-व्यवसायाबद्दल काडीचीही माहिती नसताना केवळ जिद्द, चिकाटी आणि एकीच्या जोरावर त्यांनी घरगुती व्यवसायाचं गृहउद्योगात रुपांतर करत उत्तुंग झेप घेतली आणि आपल्या पंखाखाली शेकडो महिलांच्या पंखांनाही बळ दिलं. एका सामाजिक कार्यकर्त्याकडून 80 रुपये उधार घेऊन या प्रवासाची सुरुवात झाली होती. कोट्यवधींची उलाढाल असलेल्या उद्योगाच्या गरुड भरारीत जसवंती बेन यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी आपल्या सहा मैत्रिणींना एकत्र घेऊन हे साम्राज्य उभं केलं आहे. मैत्रिणींनी मिळून घेतला पुढाकार 1956 साली लिज्जत पापडची सुरुवात झाली. यासाठी जसवंती बेन यांच्यासह त्यांच्या 7 मैत्रिणींनी पुढाकार घेतला होता. मुंबईत गिरगाव परिसरात राहणाऱ्या या मैत्रिणींमध्ये पार्वतीबेन रामदास ठोदानी, उजमबेन नरानदास कुंडलिया, बानुबेन तन्ना, लागूबेन अमृतलाल गोकानी, जयाबेन विठलानी यांचा समावेश होता. तसंच यामध्ये आणखी एका महिलेचा समावेश होतो जिला पापड विक्रीची जबाबदारी देण्यात आली होती. या सर्वांनी प्रारंभी घरीच पापड बनवायला सुरुवात केली होती. या सर्व मैत्रिणींचा उद्देश हा व्यवसाय करणं नव्हता, तर घर चालवण्यासाठी हातभार लावणं हा होता. त्यामुळे त्यांनी पापड लाटण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांनी केवळ पापडाची 4 पाकिटं तयार केली होती. त्यांनी ही पाकिटं एका व्यावसायिकाला विकली. यानंतर त्यांच्या पापडाला खूपच मागणी वाढत गेली, आज हे पापड संपूर्ण देशात लोकप्रिय झालं आहे. सुरुवातीला जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांच्या उद्योगाचं नाव ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ असं होतं. त्यानंतर 1962 मध्ये याचं नामकरण केवळ ‘लिज्जत पापड’ असं करण्यात आलं. लिज्जत हा शब्द गुजराती भाषेतला असून याचा अर्थ ‘टेस्टी’ असा होता. 7 मैत्रिणींनी अवघ्या 80 रुपयांच्या उधारीवर सुरू केलेला पापड व्यवसाय आज 42000 स्त्रियांना रोजगार देतो आहे. लिज्जत पापडच्या 60 च्या वर शाखा आहेत. देशभर हा पापड विकला जातो. एवढंच नाही तर इंग्लंड, अमेरिका, सिंगापूर, थायलंड, लेदरलँड्स आदी देशांमध्ये निर्यातही होतो. जसवंतीबेन पोपट यांना उद्योग क्षेत्रातल्या कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्यासह 102 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. 2021 सालातल्या पुरस्कारांमध्ये 7 जणांना पद्म विभूषण, 10 जणांना पद्म भूषण पुरस्कार मिळाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.