आजकाल नोकरीतील ताणतणाव, कामाचा लोड आदी कारणांमुळे अनेकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ऑफिसमधील ताणतणाव कमी कसा करता येईल, यासाठी अनेकजण वेगवेगळ्या पर्यायांच्या शोधात असतात. कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन काही कंपन्यांनीदेखील सकारात्मक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रिम 11 या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी एक खास पॉलिसी तयार केली आहे. सुट्टीच्या दिवशी कोणत्याही कर्मचाऱ्याला कंपनीच्या कामासंदर्भात फोन किंवा मेसेज केला जाणार नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याला सुट्टीच्या दिवशी कामाकरिता फोन किंवा मेसेज करून त्रास दिला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी घोषणा ड्रिम 11 कंपनीने केली आहे. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे. फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रिम 11 कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन खास धोरण आखले आहे. यामुळे कर्मचारी सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या कॉल किंवा मेसेजची चिंता न करता एन्जॉय करू शकणार आहेत. या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी कंपनीकडून कोणताही फोन किंवा मेसेज करून त्रास दिला जाणार नाही. जर कंपनीतील कोणी एखाद्या कर्मचाऱ्याला सुट्टीच्या दिवशी फोन किंवा मेसेज करून त्रास दिला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना सुट्टीचा पुरेपूर आनंद घेता यावा, यासाठी या कंपनीने हे नवीन धोरण घोषित केलं आहे. कंपनीच्या या धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कर्मचाऱ्यांना कंपनीच्या सर्व यंत्रणा आणि ग्रुपपासून वेगळं राहण्याची परवानगी देणं हे खूप फायदेशीर असल्याचं कर्मचारी सांगतात. ``आम्हाला सात दिवस ऑफिस कॉल, मेसेज किंवा व्हॉट्सअॅपचा त्रास होणार नाही. यामुळे आम्हाला काही वेळ चांगला घालवण्याची संधी मिळेल,`` असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. ``कामातून सर्वोत्तम रिझल्ट देण्यासाठी ताजंतवानं, आनंदी आणि नवी ऊर्जा मिळणं गरजेचं आहे,`` असं ड्रिम 11 च्या एका कर्मचाऱ्यानं सांगितलं. अनेकदा कर्मचारी सुट्यांचा आनंद घेण्यासाठी अशा ठिकाणी जातात तिथं नेटवर्कची समस्या असते. अशावेळी त्यांच्या मनावर ऑफिसचे कॉल आणि मेसेजला उत्तर देण्यासाठी दबाव असतो. ड्रिम 11 चं हे नवीन धोरण अशा कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. आता अगदी निर्धास्तपणे सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकणार आहेत. दरम्यान, ड्रिम 11 च्या या अनप्लग पॉलिसीत नमूद आहे की कर्मचारी सुट्ट्यांचा आनंद आता कामाशी संबंधित ईमेल, मेसेज किंवा कॉलविना घेऊ शकणार आहेत. त्यांना कंपनीकडून कोणत्याही प्रकारे त्रास दिला जाणार नाही. कर्मचारी एक आठवड्याच्या सुट्टी दरम्यान कामापासून स्वतःला पूर्णपणे वेगळे ठेऊ शकणार आहेत. कंपनीने लिंक्डइनवर या नवीन पॉलिसीची घोषणा केली आहे. लिंक्डइनवरील पोस्टमध्ये कंपनीने लिहीलं आहे की ड्रिम 11 मध्ये आम्ही प्रत्यक्षात ड्रिमस्टरला लॉग ऑफ करतो. माध्यमातील वृत्तानुसार, ड्रिम 11 कंपनीचे संस्थापक हर्ष जैन आणि भावित सेठ यांनी सांगितलं, ``जो कर्मचारी अनप्लग कालावधीत अन्य कर्मचाऱ्याशी संपर्क करेल, त्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. कंपनीतील प्रत्येकाला खासगी गोष्टी किंवा भाड्याची तारीख अथवा कोणत्याही कारणासाठी अनप्लग वेळ मिळू शकतो. कंपनी कोणत्याही कर्मचाऱ्यावर अवलंबून राहू नये यासाठी हे धोरण लागू करण्यात आले आहे.``
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.