मुंबई: यंदाच्या वर्षी 1 ऑक्टोबर (2022) या दिवशी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर झालेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसच्या सहाव्या आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात 5G नेटवर्क लाँच केल्याची अधिकृत घोषणा केली.
5G नेटवर्क कमालीचा स्पीड, लोअर लेटन्सी आणि डेटा नेटवर्कला अधिक सक्षम करतं. त्यामुळे देशात 5G नेटवर्कची गरज भासू लागली होती. सध्या भारतातील मोजक्या शहरांमध्ये रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलनं आपल्या ग्राहकांना 5G नेटवर्क देऊ केलं आहे.
आता नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष, मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा कारभार हाती घेऊन 20 वर्षं झाल्यानिमित्त रिलायन्सनं 5G नेटवर्कबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. मुकेश अंबानी यांनी घोषणा केली आहे की, 2023 मध्ये देशातील प्रत्येक शहर आणि गावात जिओ 5G नेटवर्क सुविधा उपलब्ध होईल.
आरआयएलचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बुधवारी (28 डिसेंबर) कंपनीचे संस्थापक आणि त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या व्हर्च्युअल भाषणात ही माहिती दिली. मुकेश अंबानी म्हणाले, "रिलायन्स टेलिकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली 2023 पर्यंत देशभरात जिओ 5G सुविधा उपलब्ध होईल.
आपलं पहिल्या क्रमांकाचं स्थान आणखी मजबूत केल्याबद्दल मी जिओ टीमचं अभिनंदन करतो. जिओ प्लॅटफॉर्म्सनं आता भारतातील पुढील मोठ्या संधीसाठी सज्ज झालं पाहिजे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत युनिक डिजिटल सोल्यूशन प्रदान करण्याची ही संधी आहे. लवकरच भारतातील प्रत्येक गावात जिओ 5G नेटवर्क पोहचेल.
प्रत्येक भारतीयाला चांगलं शिक्षण आणि चांगली आरोग्यसेवा मिळेल. देशातील कोणतीही व्यक्ती उच्च उत्पादकतेपासून वंचित राहणार नाही. "या शिवाय, मुलगी ईशाच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा (आरआयएल) रिटेल व्यवसायदेखील झपाट्यानं वाढला आहे, असा दावाही मुकेश अंबानी यांनी केला आहे.
कंपनीचा विस्तार वटवृक्षाप्रमाणे
आरआयएलच्या भविष्याबाबत मुकेश अंबानी म्हणाले, "कंपनी 'वटवृक्षा'प्रमाणे वाढत राहील. कंपनीचा विस्तार मोठ्या प्रमाणात होईल आणि पाळंमुळं आणखी खोलवर जातील. या वृक्षाचं बीज पेरणारे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचं आम्ही कायम कृतज्ञतेनं स्मरण करू." रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलचे नेतृत्व करणारा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी यांच्या नेतृत्वाचीही मुकेश अंबानींनी प्रशंसा केली.
2002 मध्ये ज्येष्ठ उद्योगपती आणि वडील धीरूभाई अंबानी यांच्या आकस्मिक निधनानंतर मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सूत्रं हाती घेतली होती. मुकेश यांनी रिलायन्सची जबाबदारी स्वीकारून 20 वर्षे पूर्ण झाली आहेत.
मुकेश अंबानी यांच्या व्यावसायिक कौशल्यामुळे आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे रिलायन्स आज देशातील सर्वांत आघाडीची कंपनी बनली आहे. मुकेश अंबानी यांनी पदभार स्वीकारल्यापासून, गेल्या 20 वर्षांत कंपनीचं उत्पन्न 17 पटींनी तर कंपनीचा नफा 20 पटींनी वाढला आहे. सध्या रिलायन्स पेट्रोलियम आणि टेक्सटाइलच्या पलीकडे जाऊन टेलिकॉम, रिटेल, मीडिया आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्ससारख्या क्षेत्रांमध्ये वर्चस्व असलेला जागतिक समूह बनला आहे.
2047 पर्यंत भारत 40 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकतो
मुकेश अंबानी म्हणाले, "21व्या शतकाकडे जग 'भारताचं शतक' म्हणून पाहत आहे. 2047 पर्यंत आपल्या देशाची अर्थव्यवस्था 40 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहचू शकते. भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासातील पुढील 25 वर्षं सर्वांत जास्त परिवर्तनाची असतील."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 5G