मुंबई,5 नोव्हेंबर- अडचणीच्या काळात हातात पैसे असणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण पैशाची बचत (Savings) करण्याला प्राधान्य देतो. बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काहीजण बँक (Bank) खात्यामध्ये पैसे जमा करतात तर काहीजण पतसंस्थांसारख्या वित्तसंस्थांमध्ये. गावागोवी असलेले बचत गट हे महिलांसाठी उत्तम पर्याय मानले जातात. विविध बचत पर्यायांपैकी 'बँक' हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. आपण जे पैसे आपल्या बचत खात्यामध्ये ठेवतो त्यावर व्याज काही प्रमाणात व्याज मिळते. त्यामुळं पैशांची बचत तर होतेच शिवाय आपला आणखी फायदा देखील होतो. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये बँकांनी बचत खात्यांवरील व्याजदर (Interest Rates) कमी केले आहेत. त्यामुळं मोठी रक्कम असूनही अतिशय कमी प्रमाणात व्याज मिळते. बहुतांशी बँकांमध्ये हीच स्थिती आहे. तरीदेखील अशा काही स्मॉल फायनान्स बँका (small finance banks) अस्तित्त्वात आहेत, ज्या सेव्हिंग्ज अकाउंटवर ग्राहकांना समाधानकारक व्याज देत आहेत. टीव्ही 9 भारतवर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
नवीन किरकोळ (Retail) ग्राहकसंख्या वाढवण्याच्या हेतूनं काही स्मॉल फायनान्स बँका ग्राहकांना बचत खात्यांवर जास्त व्याज देत आहेत. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत या बँकांचा व्याजदर जास्त आहे. जर तुम्हीसुद्धा एखाद्या स्मॉल फायनान्स बँकेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्या अगोदर काही गोष्टींची माहिती करून घेणं आवश्यक आहे. तुम्ही निवडलेल्या बँकेचं ट्रॅक रेकॉर्ड दीर्घकालीन आहे का? सेवेची गुणवत्ता चांगली आहे का? शाखांचं नेटवर्क मोठं आहे का? विविध शहरांमध्ये एटीएम सेवा उपलब्ध आहेत का? या गोष्टी नक्की जाणून घ्या आणि मगच त्याठिकाणी तुमचे पैसे ठेवा.
सेव्हिंग्ज अकाउंटवर जास्त व्याजदर देणाऱ्या बँक -
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक -
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर 7 टक्के दरानं व्याज देत आहे.
एयू (AU) स्मॉल फायनान्स बँक -
एयू स्मॉल फायनान्स बँकेमध्ये सेव्हिंग्ज अकाउंट सुरू केल्यास त्यावर 7 टक्के व्याज मिळत आहे. याठिकाणी बचत खातं उघडल्यानंतर तुम्हाला आपल्या खात्यामध्ये प्रतिमहिना सरासरी 2 ते 5 हजार रुपये शिल्लक ठेवावे लागतात.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक -
तुम्हाला सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेत बचत खात्यावर 6.25 टक्के व्याजदर मिळतो. या बँकेतील बचत खात्यामध्ये सरासरी 2 हजार रुपये मासिक शिल्लक ठेवावी लागते.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
एयु आणि उज्जीवन बँकांप्रमाणं, इक्विटास स्मॉल फायनान्स बँकदेखील आपल्या खातेधारकांना बजत खात्यावर 7 टक्के व्याज देते. या बँकेतील बचत खात्यामध्ये तुम्हाला महिन्याकाठी सरासरी 2 हजार 500 ते 10 हजार रुपये शिल्लक ठेवावी लागते.
वरील सर्व बँका बीएसईच्या (BSE) यादीमध्ये समाविष्ट केलेल्या स्माल फायनान्स बँक आहेत. या बँकांनी त्यांच्या वेबसाईटवर व्याजदराची आणि नियमित बचत खात्यासाठी किमान शिल्लक ठेवण्याबद्दल माहिती दिलेली आहे. ज्या स्मॉल फायनान्स बँकांनी आपल्या वेबसाईटवर व्याजदराची माहिती दिलेली नाही, त्यांची याठिकाणी दखल घेतली गेलेली नाही.पैशांची बचत करण्यासाठी आणि त्यावर जास्त व्याजदर मिळवण्यासाठी स्मॉल फायनान्स बँका चांगला पर्याय म्हणून समोर येत आहेत. मात्र, अशा बँकांच्या खात्यामध्ये तुम्हाला महिन्यासाठी शिल्लक ठेवावी लागणारी रक्कम देखील जास्त आहे. त्यामुळं महिन्याकाठी हजार-पाचशे रुपयांची बचत करू शकणाऱ्या अतिसामान्य ग्राहकांना ही रक्कम खूप जास्त वाटण्याचीही शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Savings and investments