नवी दिल्ली, 16 डिसेंबर : पेट्रोल, डिझेल च्या किमती दिवसेंदिवस वाढत चाललेल्या असताना आता मोदी सरकारने डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवर लावलेला विंडफॉल टॅक्स कमी केला आहे. यामुळे तेल कंपन्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलबाबत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव कमी होत आहेत. आता केंद्र सरकारनेही विंडफॉल टॅक्समध्ये कपात केली आहे. भारतीय तेल कंपन्यांच्या कच्च्या तेलावर 4900 रुपये प्रति टन असलेला कर आता 1700 रुपये प्रति टन इतका कमी करण्यात आलाय. एटीएफ म्हणजे एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवर असलेला प्रति लिटर 5 रुपयांचा विंडफॉल टॅक्स आता 1.5 रुपयांचा करण्यात आलाय. पेट्रोलवर झिरो विंडफॉल टॅक्स लागतो. तो तसाच ठेवण्यात आलाय. हायस्पीड डिझेलवर विंडफॉल टॅक्स 5 रुपये करण्यात आलाय. सध्या तो 8 रुपये इतका होता. वाचा - सोनं-चांदी गुंतवणूक करावी का? येत्या 15 दिवसात दर किती वाढेल; तज्ज्ञ काय म्हणतात केंद्र सरकारने 1 जुलैला एटीएफवर 6 रुपये प्रति लिटर व डिझेलवर 13 रुपये प्रति लिटर इतकी एक्स्पोर्ट ड्युटी लावली होती. तसंच देशांतर्गत कच्च्या तेलाच्या उत्पादनावर 2323250 रुपये प्रति टन इतका विंडफॉल टॅक्सही लावला होता. विंडफॉल टॅक्स एखाद्या विशेष परिस्थितीत लावला जातो. एखाद्या क्षेत्राला किंवा कंपनीला भरपूर नफा झाला, तर हा कर लावला जातो. एखाद्या कंपनीला कमी कष्टात जास्त फायदा मिळाला, तर सरकार त्या कंपनीवर विंडफॉल टॅक्स लावते. सरकारकडून दर 15 दिवसांनी त्याची फेरतपासणी केली जाते. त्या आधारावर हा कर कमी-जास्त केला जातो. देशांतर्गत तेल उत्पादक कंपन्यांना मिळालेल्या फायद्याचा सरकारला लाभ करून घेण्यासाठी विंडफॉल टॅक्स महत्त्वाचा ठरतो. आजपासून (16 डिसेंबर) हे नवीन दर लागू होतील.
रशिया-युक्रेन युद्धाच्या परिस्थितीचा तेल कंपन्यांना फायदा झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या. मार्च तिमाहीत या किमती 139 डॉलर प्रति बॅरलवर पोचल्या होत्या. त्याचा भारतीय तेल कंपन्यांनाही फायदा झाला. तेल कंपन्यांना झालेल्या नफ्यामुळे देशाच्या तिजोरीत भर पडावी यासाठी सरकारनं विंडफॉल टॅक्स लावला. असा टॅक्स लावणारा भारत हा एकमेव देश नाही. अनेक देश ऊर्जा कंपन्या किंवा तेल कंपन्यांवर विंडफॉल टॅक्स लावतात.