बीड, 16 सप्टेंबर : खरंच बँकेत पैसे सुरक्षित आहेत का? असा प्रश्न ही बातमी वाचून पडेल. बीड शहरातील HDFC बँकेच्या एका खातेदाराच्या बँक खात्यातून तब्बल 1 लाख 12 हजार रुपये डेबिट झाले. बँकेला विचारायला गेले असता या खातेदाराला तब्बल 25 दिवस बँकेत चकरा माराव्या लागल्या. त्यानंतर बँकेने दिलेले उत्तर ऐकून खातेदाराच्या पायाखालची जमीनच सरकली. ही घटना बीडमधील (beed hdfc bank) फेरोज खान पठाण यांच्या बाबतीत घडली. बँकेला विचारलं असता नावात साम्य असल्यानं हा प्रकार घडला आहे. लवकर पैसे देऊ असे उत्तर देण्यात आलं आहे. नावात साम्य असणाऱ्या दिल्लीमधील व्यक्तीने दिल्लीच्या ब्रँचमध्ये कर्ज घेतले. मात्र, वसुली बीडच्या खातेदाराकडून केली. विशेष म्हणजे बँक खात्यातून पैसे डेबिट झाल्यानंतर सात-आठ दिवसांनी पत्रदेखील पोहोचले. ज्यामध्ये कर्जासंदर्भात नोटीस आली होती. यात तब्बल 2 लाख 24 हजार रुपये कर्ज असल्याची नोटीस आहे. यामुळं खात्याला होल्ड लावला. यामुळे फेरोज खान यांना नाहक त्रास झाला. यामुळे संतापलेल्या फिरोज खान यांनी बँकेमध्ये मॅनेजरला जाब विचारला. बँकेत पैसे सुरक्षित आहेत का? असा प्रश्न फिरोज खान पठाण यांनी उपस्थित केला. यावेळी बँक व्यवस्थापक आणि इतर कर्मचारी निशब्द झाले. बँक कर्ज देत असताना कित्येक कागदपत्रे मागते आणि नंतर कर्ज देते. मात्र, या प्रकरणामध्ये दिल्लीमधील एका व्यक्तीचे आणि बीडमधील एका व्यक्तीचे नाव साम्य असल्यामुळे जर बीडमधील खातेदाराचे पैसे बँक कुठलीही खातरजमा न करता कर्ज खात्यात वर्ग करून घेणार असेल तर हे धक्कादायक आहे. तसेच यामुळे बँकेत पैसा सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. माझ्या खात्यातील पैसे डेबिट झाल्यानंतर मी बँकेला गेल्या 25 दिवसांपासून रोज फेऱ्या मारत आहे. मात्र, तिथं कुठलाच अधिकारी-कर्मचारी माझं ऐकून घेत नाहीत. तसेच मला पैसे मिळाले नाहीत म्हणून खूप मोठा मानसिक त्रास झाला आहे. माझ्याबरोबर घडलेला असा प्रकार इतर लोकांसोबत घडू नये, यासाठी या बँक प्रशासनावर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी पठाण फिरोज खान यांनी केली आहे. हे वाचा - Pune Jobs: विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे इथे नोकरीची सुवर्णसंधी; ‘हे’ उमेदवार असतील पात्र या प्रकरणात बीडमधील बँकेचे व्यवस्थापक यांना विचारणा केली असता या प्रकरणात बँकेचा स्वतंत्र जनसंवाद कक्ष असून तो मुंबईमध्ये आहे. तिथल्या व्यवस्थापकाशी तुम्ही बोलून घ्या, असे म्हणून त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली. मुंबईमधील एचडीएफसी बँकेचे जनसंपर्क अधिकारी संजय ओझा यांनी घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत सात दिवसांमध्ये या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल, असे उत्तर दिले. मात्र, गेल्या 25 दिवसांपासून चकरा मारणाऱ्या फिरोज पठाण यांना अद्याप उत्तर न मिळाल्याने त्यांनी बँकेसमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







