मराठी बातम्या /बातम्या /मनी /अरे वाह! आता सुरु करा स्वतःचा मोठा बिझिनेस; इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन सुरु करून कमवा भरघोस पैसे

अरे वाह! आता सुरु करा स्वतःचा मोठा बिझिनेस; इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन सुरु करून कमवा भरघोस पैसे

असं सुरु करा इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन

असं सुरु करा इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन

पब्लिक चार्जिंग स्टेशन (PCS) हा कमाईचा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढेल तसा यातला नफाही वाढत जाईल.

  मुंबई, 04 डिसेंबर:  सध्या इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. प्रदूषणाबाबत जागरूकता, इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicles) उपलब्धतेत होणारी वाढ आणि पेट्रोल, डिझेलच्या (Petrol-Diesel) वाढत्या किमती यामुळे नागरिक इलक्ट्रिक वाहनं घेण्याकडे वळत आहेत. देशातल्या अनेक नामांकित वाहन उत्पादक कंपन्या विविध प्रकारची इलेक्ट्रिक वाहनं उत्पादित करत आहेत. सरकारही इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला आणि निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असल्याने ही वाहनं चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशनची (Charging Stations) गरज वाढत आहे. आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आणखी वाढणार आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशन्सची (Public Charging Stations-PCS) मागणीही चांगलीच वाढणार आहे. त्यामुळे पब्लिक चार्जिंग स्टेशन (PCS) हा कमाईचा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढेल तसा यातला नफाही वाढत जाईल. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी येणारा खर्च (Investment) अगदी कमी असून, त्या तुलनेने यात फायदा अधिक आहे. सध्या चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी पेट्रोल पंपासारखी परवान्याची गरज नाही. त्यामुळे कोणीही सामान्य माणूस असं स्टेशन सुरू करू शकतो; मात्र हे स्टेशन सुरू करण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने (Energy Ministry) काही नियम आणि अटी जारी केल्या आहेत. त्यानुसार, सार्वजनिक चार्जिंग स्टेशन स्थापन करण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 300 ते 500 चौरस फूट जागा असावी, जेणेकरून एका वेळी 2-3 कार सहज चार्ज करता येतील. तसंच आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये सर्व संबंधित उपकरणांसह एक विशेष ट्रान्सफॉर्मर असणं आवश्यक आहे. त्यामध्ये प्लग-इन नोजल, 33/11 केव्ही केबल, सर्किट ब्रेकर असणं आवश्यक आहे.

  चार्जिंग स्टेशनमध्ये किमान एक इलेक्ट्रिक किऑस्क असणंदेखील आवश्यक आहे, ज्यामध्ये अनेक चार्जिंग पॉइंट्स असतील आणि त्यात गरजेनुसार वाढही करता येईल. लांब पल्ल्याच्या आणि अवजड वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनवर 100 kW क्षमतेचे दोन चार्जर्स असणं आवश्यक आहे. वेगवान चार्जर बसवायचा असल्यास चार्जिंग स्टेशनवर लिक्विड कूल्ड केबल वापरावी लागेल. इथली सर्व उपकरणं ISO प्रमाणित असणं आवश्यक आहे. याशिवाय, वाहन चार्ज करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करण्याकरिता ऑनलाइन नेटवर्क सेवा (Online Network Service) उपलब्ध करावी लागेल. त्याकरिता अशी सेवा देणाऱ्या पुरवठादार कंपनीशी संपर्क साधावा लागेल. चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी जमीन भाड्यानेही घेतली जाऊ शकते. त्यासाठी तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असेल.

  सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या ऊर्जा विभागाशी संपर्क साधावा लागेल. याशिवाय टाटा पॉवर, डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स, इव्हॉल्ट, पॅनासोनिक यांसारख्या चार्जिंग स्टेशन स्थापन करणाऱ्या कंपन्यांशीही तुम्ही संपर्क साधू शकता. सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी, विद्युत निरीक्षक अर्थात इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरकडून मंजुरी मिळणं आवश्यक असेल. स्थानिक वितरण कंपनीद्वारे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरची (Electrical Inspector) नियुक्ती केली जाते. चार्जिंग स्टेशन सुरू करण्यापूर्वी त्याची तपासणी केली जाईल. त्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही तुमचं चार्जिंग स्टेशन सुरू करू शकता.

  असं चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी साधारणतः 16.5 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. यामध्ये वीज, देखभाल, चार्जिंग उपकरणं अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. तुम्ही तुमचं चार्जिंग स्टेशन 16 तास सुरू ठेवल्यास प्रति युनिट 3.5 रुपये दराने शुल्क आकारून तुम्ही चार वर्षांतच तुमचा संपूर्ण खर्च वसूल करू शकता. भविष्याचा विचार करता चार्जिंग स्टेशन उघडणं हा एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो. कमी गुंतवणुकीत उत्तम कमाई करून देणारा हा व्यवसाय तुमचं यशस्वी व्यवसायाचं स्वप्न पूर्ण करील, यात शंका नाही.

  First published:
  top videos

   Tags: Money, Start business, Tesla electric car