Home /News /money /

Inflation in India: महागाईचा उच्चांक, 10 वर्षांपूर्वी 100 रुपयांना मिळणारी वस्तू आज कितीला मिळते?

Inflation in India: महागाईचा उच्चांक, 10 वर्षांपूर्वी 100 रुपयांना मिळणारी वस्तू आज कितीला मिळते?

वर्षभरापूर्वी जर एखादी वस्तू 100 रुपयांना मिळत असेल आणि आता तिची किंमत 105 रुपये झाली असेल तर याचा अर्थ त्याचा वार्षिक महागाई दर 5 टक्के आहे. म्हणजेच आज आपल्याकडे असलेल्या 105 रुपयांची किंमत ही एक वर्षभरापूर्वी 100 रुपयांच्या बरोबरीची आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 24 मे : देशात सध्या महागाईनं उच्चांक (Inflation Rise) गाठला आहे. जीवनावश्यक गोष्टीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. भाज्या, फळं, धान्यं हे सगळं महिन्याच्या बजेटमध्ये बसवताना सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. महागाईच्या दरानं गेल्या 8 वर्षांतला उच्चांक गाठला आहे. एप्रिलमध्ये महागाईचा किरकोळ दर 7.79% होता. यापूर्वी 2014 मध्ये महागाईचा दर 8 टक्क्यांपेक्षा वर गेला होता. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलं आहे. महागाई हा माणसाचा आनंद, सुख हिरावून घेणारा एक राक्षस आहे असं म्हणतात ते काही खोटं नाही. भारतासारख्या देशात तर महागाईचा दर वाढणं हा एक आणखीनच चिंतेचा विषय आहे. कारण आपल्या देशात आजही 80 कोटींपेक्षा जास्त जनता गरीब आहे. आपल्या देशात सर्वसामान्य माणसाचं महिन्याचं उत्पन्न सरासरी साडेबारा हजार आहे. सध्याच्या महागाईच्या काळात या 80 कोटी जनतेचं पोट भरण्यासाठी सरकारतर्फे मोफत धान्य दिलं जातं. सरकारच्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात ग्राहक मूल्य निर्देशांकावर (Consumer Price Index- CPI) आधारित किरकोळ महागाई दर 7.79 % इतका होता. गेल्या 8 वर्षांमधील हा सर्वांत उच्चांकी दर आहे. यापूर्वी 2014 च्या मे महिन्यात महागाईचा दर 8.33% होता. कोरोनामुळे आधीच आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात आता महागाईनं पार कंबरडं मोडलं आहे. महागाईचा दर वाढणं याचाच अर्थ कोणत्याही वस्तू किंवा सेवेची किंमत काळानुसार वाढणं. याला कोणत्याही महिना किंवा वर्षाच्या हिशेबानुसार मोजलं जातं. उदाहरणार्थ वर्षभरापूर्वी जर एखादी वस्तू 100 रुपयांना मिळत असेल आणि आता तिची किंमत 105 रुपये झाली असेल तर याचा अर्थ त्याचा वार्षिक महागाई दर 5 टक्के आहे. म्हणजेच आज आपल्याकडे असलेल्या 105 रुपयांची किंमत ही एक वर्षभरापूर्वी 100 रुपयांच्या बरोबरीची आहे. - सध्या महागाईचा दर 2012 च्या बेस प्राईसवर मोजला जातो. म्हणजेच 2012 मध्ये 100 रुपयांत जी गोष्ट आपण खरेदी करू शकत होतो तिच्यासाठी आता किती किंमत मोजावी लागते यावरून त्याचा अंदाज बांधला जातो. - 2012 मध्ये एखादी गोष्ट आपण जर 100 रुपयांमध्ये खरेदी करत असू तर आता त्याच गोष्टीसाठी आपल्याला 170. 1 रुपये खर्च करावे लागत आहेत. त्याच गोष्टीसाठी एक वर्षभरापूर्वी 157.8 रुपये मोजावे लागत होते. म्हणजेच एका वर्षात तीच गोष्ट खरेदी करण्यासाठी 12.3 रुपये जास्त मोजावे लागत आहेत. - एका वर्षभरातच तीच गोष्ट खरेदी करण्यासाठी 157.8 रुपयांऐवजी आता 170.1 रुपये खर्च करावे लागत आहे. याचाच अर्थ महागाईचा दर 7.79% इतका झाला आहे.

हे वाचा - सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा कधी? या महिन्यापासून किमती कमी होण्याची शक्यता

महागाई मोजण्याचे निर्देशांक काय आहेत? भारतात महागाईचा दर मोजण्याचे दोन निर्देशांक आहेत. एक म्हणजे ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI) आणि दुसरा आहे घाऊक (होलसेल) मूल्य निर्देशांक (WPI). CPI च्या माध्यमातून महागाईचा किरकोळ दर काढला जातो. तर WPI च्या माध्यमातून किरकोळ महागाई दर मोजला जातो. सर्वसामान्य ग्राहक किरकोळ बाजारातून सामान खरेदी करतात. किरकोळ बाजारातील सामान किती महाग किंवा स्वस्त झालं आहे हे CPI च्या माध्यमातून लक्षात येतं. तर मोठमोठ्या व्यावसायिक कंपन्या ठोक म्हणजेच घाऊक बाजारातून सामान खरेदी करतात. या होलसेल बाजारातील बदल WPI च्या माध्यमातून समजतात. जगभरातील अनेक देशांमध्ये WPI हाच महागाई मोजण्याचा मुख्य निर्देशांक मानला जातो. पण भारतात मात्र CPI हाच महागाई मोजण्याचा मुख्य निर्देशांक आहे. 2012 मध्ये 100 रुपयांना मिळत होती त्या विविध गोष्टींच्या किंमती आता साधारणपणे किती झाल्या आहेत ते बघूया. 2012 मध्ये 100 रुपयांना मिळणाऱ्या धान्यासाठी आता 152.9 रुपये मोजावे लागत आहेत. मांस आणि मच्छीची किंमत 211.8 रुपये, अंड्यासाठी 164.6 रुपये, तर दुधासारख्या जीवनावश्यक पदार्थासाठी 163.9 द्यावे लागत आहेत. खाद्यतेलाच्या किंमतीत तर प्रचंड वाढ होत आहे. तेलासाठी आता 199.5 रुपये , डाळींसाठी 166.2, साखर 119.0 रुपये मोजावे लागत आहेत. फळांची किंमत आता 172.6 रु. , भाजीची किंमत 166.3 रु., मसाल्यांसाठी 181.2 रुपये अशी वाढ झाली आहे. तर नॉन अल्कोहोलिक बेव्हरेजेससाठी 166.2, पॅकबंद अन्नपदार्थ, स्नॅक्स, मिठाई इ.ची किंमत 180. 9 रुपये झाली आहे. तयार जेवण आणि पेय 170.8 रुपये, पान-तंबाखू 193.9 रुपये, तयार कपडे 173.9 रुपये, बूट –चप्पल 166.2 रुपये, इंधन आणि लाईट 172.4 रुपये अशी वाढ झाली आहे. एकूणच, आहे त्या बजेटमध्ये घरचा खर्च कसा चालवायचा आणि मुलांसाठी, भविष्यासाठी पैसे कसे वाचवायचे हाच सर्वसामान्य माणसापुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे.
First published:

Tags: India, Inflation

पुढील बातम्या