मुंबई, 20 ऑक्टोबर: पूर्वी खरेदी करायचं म्हटलं की आपल्याला स्पेशल वेळ काढून बाजारात जावं लागायचं. तिथं दिवसभर दुकानं फिरुन आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण खरेदी करू शकायचो. या खरेदी करताना बऱ्याचदा जे दुकानात उपलब्ध आहे, तेच आपल्याला खऱेदी करावं लागायचं. आपल्याला आपल्या हव्या त्या ब्रँडच्या हव्या त्या पॅटर्नच्या गोष्टी मिळतीलच याची कोणतीही खात्री नसायची. मात्र बदलत्या काळानुसार आता खरेदीच्या पद्धतीत मोठा बदल झालाय. अलीकडे भारतात डिजिटलायझेशनची व्याप्ती खूप वेगानं वाढत आहे. अशा परिस्थितीत आता घरी बसून ऑनलाइन शॉपिंग करण्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळं देशातील ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यवसायात सातत्यानं वाढ होत आहे. Amazon, Flipkart, Myntra, Jio Mart इत्यादी अनेक कंपन्या भारतात कार्यरत आहेत आणि या कंपन्यांच्या माध्यमातून घरबसल्या विविध गोष्टी खऱेदी करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे.
ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट्स किंवा कंपन्यामुळं लोकांना घरबसल्या खरेदी करता येऊ लागली. पण त्याचवेळी अनेकदा ग्राहकांना वाईट अनुभवांनादेखील सामोरं जावं लागतं. जर तुम्हीही ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणुकीचे बळी ठरला असाल आणि तक्रार दाखल करू इच्छित असाल, तर त्यासंबंधीच्या नियमांची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे.
हेही वाचा: Bank Loan: कर्ज देण्यासाठी बँका लागतील मागे, फक्त अर्ज करताना घ्या ही काळजी
भारत सरकारच्या ग्राहक विभागानं याबाबत काही नियम केले आहेत. यानुसार ग्राहकाला ई-कॉमर्स वेबसाइटशी संबंधित कोणत्याही गोष्टीबद्दल तक्रार करायची असेल तर तो ते सहजपणे करू शकतो. हा ग्राहकाचा हक्क आहे. नियमांनुसार, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने ग्राहकांच्या कोणत्याही तक्रारीला 48 तासांच्या आत उत्तर द्यावं लागतं. ग्राहकाची तक्रार आल्यानंतर कंपनीला एक महिन्याच्या आत त्या तक्रारीचं निवारण करणंही बंधनकारक आहे.
ग्राहक त्यांच्या तक्रारी कंपनीच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून संदेशाद्वारे किंवा वेबसाइटद्वारे नोंदवू शकतात. कंपनीनं तक्रारीवर कोणतीही कारवाई न केल्यास, ग्राहक http://e-Daakhil.nic.in वर जाऊन कंपनीविरुद्ध आपली तक्रार नोंदवू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.