मुंबई 8 सप्टेंबर: गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Scammed) घटना झपाट्याने वाढू लागल्या आहे. अनेकदा क्राउड फंडिंग वेबसाइट्सच्या (Crowd Funding Websites) माध्यमातून वैद्यकीय कारणासह (Medical Causes ) इतर महत्त्वाची कारणे देत तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली जाते. घाईघडबडीत समोरच्या व्यक्तीकडूनही बऱ्याचवेळा शहानिशा न करता ऑनलाईन पेमेंटच्या (Online Payment) माध्यमातून पैसेही दिले जातात. पण जेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात येते, तेव्हा भविष्यात कोणाला मदत करण्याची इच्छा राहत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा फसवणुकीच्या (Fraud) घटना कशा होतात, याबाबत माहिती देणार आहोत. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय. टेक्नॉलॉजीचे अनेक फायदे असले तरीही हे फायदे घेताना खबरदारी घेणंही महत्त्वाचं आहे. याबाबत थोडीशीही चूक झाली तर तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. कारण आता दिवसेंदिवस वैद्यकीय मदतीच्या नावाखाली पैसे उकळण्याचं प्रमाण वाढलं आहे.
तुमच्या नकळत PAN Cardचा गैरवापर केलाय का कसं कळेल? फसवणूक टाळण्यासाठी काय कराल
एखादी व्यक्ती किंवा लहान मूल गंभीर आजारी आहे, कुटुंब असहाय्य आहे, मदतीची गरज आहे, कर्जाचा बोजा आहे, शिक्षणाचा खर्च आहे, कृपया मदत करा… अशा गोष्टी क्राउड फंडिंग (Crowd Funding) वेबसाइट्सच्या माध्यमातून दिवसातून एकदा तरी तुमच्या मोबाइलवर येत असतील. हे वाचल्यानंतर माणुसकीच्या नात्याने कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी क्राउड फंडिंग वेबसाइटवर मदत केली असेल. पण ही मदत करत असताना तुमची फसवणूक होण्याची शक्यता असून नुकतेच असे प्रकारही समोर आलेत. त्यापैकी काही प्रकारांची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. डॉक्टरांचे बनावट प्रमाणपत्र बनवले क्राउड फंडिंग वेबसाइट ‘केटो’ (Ketto) वर गेल्या ऑगस्टमध्ये मदतीसाठी एक कॅम्पेन सुरू झाले, ज्यामध्ये एका व्यक्तीने लिहिले की, त्याची 24 वर्षीय बहीण तान्यासिंगला कॅन्सर आहे. तिला उत्तर प्रदेशातील वैशाली येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कुटुंब अत्यंत गरीब असून केमोथेरपीसाठी पैसे नाहीत. कुटुंबाला 9 लाखांपेक्षा जास्त रुपयांची गरज आहे. ‘केटो’वर बहिणीच्या उपचारांसाठी कॅम्पेन चालवणाऱ्या व्यक्तीने मॅक्स हॉस्पिटलच्या लेटरहेडवर उपचाराचं अंदाजे साडे नऊ लाखांचं कोटेशन पोस्ट केलं होतं. हे बिल पाहिल्यानंतर ते खरं असल्याचं वाटत होतं, कारण त्यावर डॉक्टरांचा सही आणि शिक्काही होता. त्यामुळे लोकांनी मदत करण्यास सुरूवात केली. PFचे पैसे जमा झाले नाहीत तर घाबरू नका, तक्रार कशी कराल जाणून घ्या पुढे हे कॅम्पेन इतकं व्हायरल झाली की, ते मॅक्स हॉस्पिटलमधील ऑन्कोलॉजिस्ट डॉ. प्राची जैन यांच्यापर्यंत पोहोचलं. त्यावेळी मात्र डॉ. जैन यांना हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. कारण ‘केटो’वर जे बिल पोस्ट केलं होतं, त्यावर डॉ. प्राची यांची स्वाक्षरी आणि शिक्का दिसत होता. पण त्यांनी असं पत्र कधीच दिलं नव्हतं. डॉ. प्राची यांच्या म्हणण्यानुसार, सायबर गुन्हेगाराने मदत मागण्यासाठी जे पत्र पोस्ट केलं होतं, त्यांनी असंच पत्र एका पीडित मुलासाठी बनवलं होतं, कारण ते कुटुंब खूप गरीब होतं, व त्यांना क्राउड फंडिंगमधून मदत मिळवायची होती, परंतु सायबर गुन्हेगाराने त्याच पत्राची बनावट कॉपी करुन लाखोंचा निधी उभा केला. याबाबत डॉ. प्राची यांनी संबंधित क्राउंड फंडिंग वेबसाइटकडे तक्रार केली. त्यानंतर या वेबसाइटने संपूर्ण कॅम्पेन बनावट असल्याचं सांगून, लोकांनी मदत म्हणून दिलेले पैसे परत केले. मृत्युचं बनावट प्रमाणपत्र पोस्ट करत मिळवली मदत ‘मिलाप’ (Milaap) या दुसर्या एका क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्मवर असाच एक फसवणुकीचा प्रकार समोर आला. यावर अर्पितसिंग नावाच्या व्यक्तीने त्याचे वडील वारले असून, तो फक्त 20 वर्षांचा आहे, अशी पोस्ट केली होती. त्याला 3 लाख रुपयांची मदत हवी होती. व्हेरिफिकेशनसाठी त्याने वडिलांच्या मृत्यूचं लखनौ महानगरपालिकेचं प्रमाणपत्र पोस्ट केलं. या वेळी त्याला 2 लाख 86 हजारांहून अधिक रुपयांची मदत जमा झाली. हे सर्व रुपये अर्पितने काढले होते. यानंतर त्याने पुन्हा 3 लाखांची मदत मिळावी, यासाठी पोस्ट केली. तेव्हाही 39 जणांनी 85 हजार रुपयेही दिले. परंतु, लखनौ महानगरपालिकेने जेव्हा स्पष्ट केलं की, अर्पितने पोस्ट केलेलं मृत्यू प्रमाणपत्र बनावट आहे आणि ज्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे, तो लखनौ महापालिकेत 4 वर्षांपासून काम करत नाही. तेव्हा हा फसवणुकीचा प्रकार समोर आला. त्यानंतर मिलापने हे कॅम्पेन थांबवलं, लोकांना 85 हजार रुपये परत केले. तज्ज्ञ म्हणतात… सायबर सुरक्षा तज्ज्ञ अमित दुबे यांच्या मते, ‘क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या कोणत्याही कॅम्पेनची सत्यता पडताळणी करण्याच्या मार्गात कमतरता आहे. हे प्लॅटफॉर्म फक्त अपलोड केलेल्या कागदपत्रांवर अवलंबून राहतात. ते पूर्ण खात्री करीत नाही. कारण या वेबसाइटची कमाईदेखील या पैशातून मिळणाऱ्या कमिशनमधून होते. कोणत्याही एका क्राउड फंडमध्ये जितके जास्त पैसे जमा होतील, तितके जास्त कमिशन या वेबसाइटला मिळते.’ तर, मॅक्स हॉस्पिटलचे सीनिअर व्हाइस चेअरमन डॉ. गौरव अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, ‘असे अनेक रुग्ण हॉस्पिटलमध्ये येतात, जे उपचारांचा संपूर्ण खर्च उचलू शकत नाहीत. अशा परिस्थितीत रुग्णांकडून हॉस्पिटलला सांगितलं जातं की, त्यांना क्राउड फंडिंगद्वारे लोकांकडून मदत घ्यायची आहे. तेव्हा हॉस्पिटलमधील आर्थिक विभाग त्या रुग्णाला मदत करतो आणि त्याला किमान खर्चाचा अंदाज देतो. काहीवेळा रूग्णांच्या क्राउड फंडिंगसाठी हॉस्पिटलदेखील मदत करतं. परंतु, क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या वतीने हॉस्पिटलकडून क्रॉस-व्हेरिफिकेशन न केल्यामुळे, सायबर गुन्हेगार बनावट बिलं किंवा बनावट कोटेशन तयार करून लोकांकडून फसवणूक करून पैसे उकळतात.’ अशी घ्या काळजी 1. जर तुम्ही क्राउड फंडद्वारे मदत करत असाल, तर तुम्ही ते कॅम्पेन करणाऱ्या व्यक्तीला संबंधित कागदपत्रं वैयक्तिक नंबरवर शेअर करण्यास सांगू शकता. ज्यामुळे तुम्हाला सत्यता जाणून घेण्यास मदत होईल. 2. कागदपत्रांची सत्यता तपासण्यासाठी तुम्ही टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर करू शकता. तुम्ही गुगल रिव्हर्स इमेज टेक्नॉलॉजी वापरून कॅम्पेनमध्ये वापरलेल्या इमेजची सत्यता तपासू शकता. 3. तुम्ही मदत केलेले पैसे कोणाकडे जाणार आहेत, हे नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ते कॅम्पेन कोण सांभाळत आहेत? त्यांचा उद्देश काय आहे? त्या व्यक्तीने त्याचा खरा फोटो, कागदपत्रं वेबसाईटवर टाकली आहेत का, याची खात्री करा. वैद्यकीय कारणांसाठी माणुसकीच्या नात्याने एखाद्याला मदत करणं, ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. परंतु, ही मदत करताना आपली फसवणूक होणार नाही, याचीही काळजी घेणं महत्त्वाचं आहे.