विलासपूर, 17 फेब्रुवारी : दुचाकी किंवा चार चाकी गाडी घेतल्यानंतर त्याला हवा तो नंबर घेण्यासाठी अनेकदा मोठी रक्कम मोजली जाते. आरटीओकडून यासाठी लिलाव पद्धतीने फॅन्सी नंबरची विक्री केली जाते. सध्या हिमाचल प्रदेशात दोन चाकी गाडीच्या स्पेशल नंबर प्लेसाठी एक कोटीहून अधिक बोली लागल्याचं समोर आलं आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना याबाबत समजले तेव्हा त्यांनी लिलाव प्रक्रियेची पूर्ण माहिती मागवली आहे. सुक्खू यांनी उपविभागीय दंडाधिकारी चेतना खंडवाल आणि वाहतूक संचालक अनुपम कश्यप यांच्याकडे लिलावाची माहिती मागवली आहे. हिमाचल प्रदेशात स्पेशल नंबरसाठी ई लिलाव घेतला जातो. दुचाकी आणि चार चाकी गाड्यांच्या नंबरसाठी बोली लावण्याचा आज शेवटचा दिवस आहे. गुरुवारी वाहतूक विभागाने सांगितलं की, दुचाकी गाडीच्या स्पेशल नंबर HP 99 - 9999 यासाठी १ कोटी १२ लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे. यानंतर नंबर प्लेटच्या या किंमतीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. हेही वाचा : Gold-Silver Rate Today in Nashik : पुण्याप्रमाणेच नाशिकमध्ये उतरले सोन्याचे दर, पाहा आजचा भाव परिवहन विभागाकडून सांगण्यात आले की, बोलीसाठी किमान किंमत १ हजार रुपये ठेवली होती. एकूण २६ लोकांनी या नंबरसाठी ई लिलावांतर्गत सहभाग घेतला होता. या नंबरशिवाय इतर अनेक स्पेशल नंबर्सना लाखो रुपयांची ऑनलाइन बोली लागली. ही लिलाव प्रक्रिया १८ फेब्रुवारीला पूर्ण होईल आणि सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीच्या नावे संबंधित नंबर राखीव ठेवला जाईल. HP ९९ हा हिमाचलच्या कोटखाई उपविभागीय परिवहनचा नंबर आहे. त्यामुळे दुचाकीचा नंबर HP 99 - 9999 असा होत आहे. कोटखाईचे एसडीएम चेतना खंडवाल यांनी सांगितले की, ई लिलावाच प्रक्रिया पारदर्शक असून सर्वांना संधी दिली आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलीचे दर आणखी वाढू शकतात असंही म्हटलंय. सोशल मीडियावर याचे फोटोही व्हायरल होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.