नवी दिल्ली, 6 जून : एचडीएफसी बँकेच्या ऑनलाइन मीटिंगमध्ये कामाचं टार्गेट पूर्ण करण्यावरून एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं बँकेच्या कर्मचाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. या ऑनलाइन मीटिंगचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र बँकेनं कर्मचाऱ्यांना झापणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करत त्याच निलंबन केलं आहे. पुष्पल रॉय असं कारवाई झालेल्या अधिकाऱ्याचं नाव असून, ते एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष होते. ‘डीएनए’ने याबाबत वृत्त दिलंय. कोलकाता येथील एचडीएफसी बँकेतील वरिष्ठ अधिकारी पुष्पल रॉय यांना अंतर्गत ऑनलाइन मीटिंगमध्ये इतर कर्मचार्यांशी चुकीच्या पद्धतीनं वागल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आलंय. पुरेशा बँकिंग सेवा, विमा विकण्यात अयशस्वी झाल्याबद्दल, टार्गेट पूर्ण न झाल्याबद्दल रॉय हे मीटिंगमध्ये कर्मचाऱ्यांना झापत होते. सारा या ट्विटर हँडलवरून या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला होता तो व्हायरल झाला, आणि त्यावरून युजर्सनी रॉय यांच्यासोबतच एचडीएफसी बँकेवर जोरदार टीका सुरू केली. अखेर रॉय यांचं निलंबन करण्याचा निर्णय बँकेनं घेत तशी माहिती ट्विट केली. बँकेनं निलंबन केलेले रॉय हे कोलकाता येथील एचडीएफसी बँकेच्या कार्यालयात 16 वर्षांहून अधिक काळ उपाध्यक्षपद पदावर कार्यरत होते. ते चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांनी यापूर्वी पीडब्ल्यूसी आणि आयसीआयसीआय बँकेत पदे भूषवली आहेत. HDFC बँकेने लॉन्च केले दोन नवे FD प्लान, गुंतवणुकीवर मिळेल जोरदार व्याज व्हिडिओमध्ये नेमकं काय? बंगाली भाषेतील या व्हिडिओमध्ये रॉय हे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामाचं स्टेटस आणि टार्गेट्सवरून ओरडताना दिसत आहेत. रॉय आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांशी अतिशय उद्धटपणे बोलतांना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, व व्हिडिओनं अनेकाचं लक्ष वेधलं. सोशल मीडिया युजर्सनी रॉय यांच्या कृतीवर टीका करतानाच त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली होती.
#HDFC bank’s Manager Mr. Pushpal Roy. Employees were treated in an unprofessional way. I would have given back right there. Not sure why & how employees are tolerating. He is completely demoralised and done blatant attacked on employees. Should be fired !
— Sarayu Raghavan (@srchetlur) June 5, 2023
#toxicworkenvironment pic.twitter.com/m0IrfqXl6b
ट्विटरवर अनेक युजर्सनी व्हिडिओवर कमेंट करताना रॉय यांच्या वर्तनावर मत व्यक्त केलं. एका युजरनं कमेंट केली की, ‘या व्यक्तीवर कारवाई न झाल्यास मी माझं एचडीएफसी बँकेतील अकाउंट एका आठवड्यात बंद करेन. कृपया या परिस्थितीचा प्राधान्यानं विचार करा, अन्यथा तुम्ही लाखो ग्राहक गमावाल.’ तर, आणखी एका युजरनं लिहिलं की, ‘कस्टमर मॅनेजमेंटच्या दृष्टीनं ही सर्वांत वाईट अनुभव असणारी बँक आहे. ते कोणत्या जगात जगतात, हे मला माहीत नाही. मागच्या वेळी मला ज्या पद्धतीनं वागणूक मिळाली होती, त्यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटलं होतं. पण ही बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांशी वाईट वागतेय.’ सोशल मीडियावर जोरदार टीका होऊ लागल्यानंतर अखेर बँकेने रॉय यांच्याबाबतीत कठोर कारवाई करत त्यांचं निलंबन केलं.
Hi Sara, this bears reference to a recent social media report. Basis a preliminary enquiry in the matter, the concerned employee has been suspended and a detailed investigation has been initiated which will be undertaken as per Conduct guidelines of the Bank. We at HDFC Bank have…
— HDFC Bank Cares (@HDFCBank_Cares) June 5, 2023
बँकेनं केलं निवेदन जारी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एचडीएफसी बँक केअर्स या हँडलवरून एचडीएफसी बँकेनं एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात म्हटलं आहे की, ‘हाय सारा… या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीच्या आधारे, संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे, व बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. आम्ही एचडीएफसी बँकेत कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाबाबत शून्य-सहिष्णुता धोरण अवलंवतो, व आमच्या सर्व कर्मचार्यांशी सन्मानानं वागवण्यावर ठाम विश्वास ठेवतो.’ दरम्यान, या प्रकरणाची सध्या बँकिंग क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे.