मुंबई,1 एप्रिल- ICICI बँकेत FD असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या बँकेने FD च्या व्याजदरात (Interest rate) वाढ केली असून, हे नवीन दर 30 मार्चपासून लागू झाले आहेत. याचाच अर्थ ICICI बँकेत एफडी असणाऱ्यांना आता त्यांच्या ठेवींवर जास्त व्याज मिळणार आहे. हे व्याजदर किती रुपयांपर्यंतच्या ठेवींवर वाढवण्यात आले आहे आणि त्यासाठी वयाची (Age limit) काही अट आहे का, या संदर्भातील सर्व माहितीसाठी ही बातमी पूर्ण वाचा. ICICI बँकेने 1 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेवींच्या व्याजदरांत (Fixed Deposits Interest Rate) 5 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. 2 कोटी रुपयांपर्यंत परंतु 5 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या सिंगल डिपॉझिटसाठी हे दर वाढवण्यात आले आहेत. हे नवीन दर 30 मार्च 2022 पासून लागू झाले आहेत. आता, ICICI बँक 1 वर्ष ते 389 दिवस आणि 390 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 4.20% व्याज दर देत आहे. यापूर्वी या एफडीचा दर 4.15 टक्के होता. म्हणजेच बँकेने 0.5 टक्क्यांनी व्याजदरात वाढ केली आहे. याव्यतिरिक्त, बँक 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 4.25% दर देत आहे. पूर्वी यावर 4.20 टक्के दर मिळत होता. 18 महिने ते 2 वर्षांचा कालावधीसाठीचा व्याजदर आता 4.30% ऐवजी 4.35 टक्के करण्यात आला आहे. लाइव्ह मिंटमधील एका बातमीनुसार, आता ठेवीदार 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षांच्या कालावधीत 4.55% दराने कमाई करू शकतात. तसेच, मागील 4.6 टक्क्यावरून 3 वर्षे ते 10 वर्षांच्या कार्यकाळावर 4.65 टक्के दर दिला जात आहे. इतर एफडींवरील व्याजदर बदललेले नाहीत
ICICI बँक 271 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 3.70 टक्के दर देत आहे. तसंच, 185 दिवस ते 270 दिवसांच्या कालावधीसाठी 3.6% व्याज दर मिळतो. तर 91 दिवस ते 184 दिवसांच्या कालावधीवर 3.35 टक्के व्याज दर लागू आहे. 61 दिवस ते 90 दिवसांच्या कालावधीसाठी 3% व्याजदर मिळतो. याशिवाय अल्पावधीत, ICICI बँक 30 दिवस ते 60 दिवसांदरम्यान 2.75 टक्के दर ऑफर करते आणि सर्वांत कमी 7 दिवस ते 29 दिवसांसाठी 2.5% दर ऑफर करते. हे सर्व दर सर्वसामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू आहेत. हे सुधारित व्याजदर ताज्या ठेवींवर आणि विद्यमान फिक्स्ड डिपॉझिट रिन्यू करण्यासाठी लागू होतील, असंही आयसीआयसीआय बँकेने स्पष्ट केलं आहे.