जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पैशांच्या गरजेवेळी Gold Loan फायदेशीर, परतफेड करताना या 4 कारणांमुळे राहाल टेन्शन फ्री!

पैशांच्या गरजेवेळी Gold Loan फायदेशीर, परतफेड करताना या 4 कारणांमुळे राहाल टेन्शन फ्री!

पैशांच्या गरजेवेळी Gold Loan फायदेशीर, परतफेड करताना या 4 कारणांमुळे राहाल टेन्शन फ्री!

एकीकडे सोन्याचे वाढणारे भाव आणि दुसरीकडे परतफेडीसाठी ग्राहकांच्या सोयीचे पर्याय यामुळे सोने तारण कर्ज घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे.

    नवी दिल्ली, 4 जून : कर्ज काढून सण साजरा करू नये, अशी भारतातल्या जुन्या लोकांची धारणा होती. सध्याचं बदललेलं जीवनमान मात्र लोकांना सतत काहीतरी साजरं करण्यासाठी खुणावणारं आहे. त्यामागे पैशाची सहज उपलब्धता हेही एक कारण आहे. त्यातच कर्ज मिळण्याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे. शिवाय पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी कर्जांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, पर्सनल लोन, गोल्ड लोन, क्रेडिट कार्ड असे काही पर्याय यात आहेत. त्यापैकी गोल्ड लोन अर्थात सोने तारण कर्ज (Gold Loan) सध्या अनेक ग्राहक घेत आहेत. त्यामागील कारणं व कर्जाच्या परतफेडीसाठीचे पर्याय याबाबत टीव्ही 9 हिंदीनं वृत्त दिलं आहे. सोन्याचे वधारलेले दर आणि लोकांचा बदललेल्या दृष्टिकोन यामुळे सोने तारण कर्जातही वाढ झालेली दिसते आहे. ग्राहकांसाठी हे कर्ज सोयीचं ठरतं. एक तर ते लवकर मंजूर होतं, तसंच पर्सनल लोनच्या तुलनेत याचा व्याजदरही कमी असतो. सोनं तारण कर्जाच्या परतफेडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. ग्राहकांच्या दृष्टीनं कर्जाची परतफेड (Loan Repayment) कशी करायची हा कळीचा मुद्दा असतो. त्यात ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार कर्ज फेडण्याचे पर्याय मिळाले, तर काळजी वाटत नाही आणि कोणत्याही त्रासाविना कर्जाची परतफेड होते. एचडीएफसी बँकेनं (HDFC Bank) त्यांच्या ग्राहकांना सोनं तारण कर्जाच्या परतफेडीसाठी चार पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यावर नजर टाकू. ईएमआयद्वारे (EMI) व्याजाची परतफेड व मुद्दल नंतर सध्या आर्थिक स्थिती चांगली नाही, पण नंतर पैसे मिळतील असं वाटत असेल, तर हा पर्याय निवडू शकता. यात कर्ज फेडण्याची अंतिम तारीख ठरलेली असते. तोपर्यंत मासिक हफ्त्यांद्वारे व्याजाची परतफेड करू शकता. अर्थात कर्ज पूर्ण झाल्यावर पूर्ण मुद्दल फेडायचं असतं. त्यामुळे दर महिन्याला संपूर्ण कर्जावर केवळ थोडीच रक्कम फेडावी लागते. यामुळे महिन्याच्या खर्चात फार वाढ होत नाही. ईएमआय इतर कर्जांप्रमाणे सोने तारण कर्जालाही मासिक हफ्त्याचा पर्याय उपलब्ध आहे. मुद्दल आणि व्याज एकत्र करून त्यावर दरमहा हफ्त्याची एक रक्कम ठरवली जाते. महिन्याच्या ठराविक तारखेला तो मासिक हफ्ता फेडावा लागतो. यामुळे हळूहळू मुद्दलाची रक्कम कमी होत जाते. अंशतः परतफेड या पर्यायात तुमच्याकडे पैसे आले, की तुम्ही कर्जाच्या आणि व्याजाच्या रकमेतील काही रक्कमेची परतफेड करू शकता. उद्योग-व्यवसाय असणाऱ्यांसाठी हा पर्याय चांगला ठरू शकतो. कारण त्यांचं मासिक उत्पन्न ठरलेलं नसतं. मुद्दलाची रक्कम कमी झाली, की व्याजही कमी होतं. त्यामुळे तुम्हाला हवं तसं परतफेडीचं नियोजन करता येऊ शकतं. कर्जाच्या कालावधीतच ही परतफेड करायची असते. बुलेट परतफेड या पर्यायात मासिक हफ्त्यांबाबत काळजी करण्याची गरज नसते. याचा हिशेब ठेवणं सोपं असतं. कर्जाच्या रकमेवर व्याजाचा दर आणि परतफेडीचा कालावधी निश्चित असतो. कर्ज पूर्ण मिळाल्यावर मुद्दल आणि त्यावरील व्याज फेडायचं असतं. म्हणजे कर्जाच्या कालावधीत कर्जाच्या परतफेडीचं सततचं टेन्शन येत नाही. फक्त कर्जाचा कालावधी संपल्यावर मुद्दल आणि व्याजाची संपूर्ण रक्कम तयार असेल, याची काळजी घेतली पाहिजे. एकीकडे सोन्याचे वाढणारे भाव आणि दुसरीकडे परतफेडीसाठी ग्राहकांच्या सोयीचे पर्याय यामुळे सोने तारण कर्ज घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: gold
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात