नवी दिल्ली, 8 एप्रिल : भारतातील कोरोनाव्हायरसचा (Covid -19) संसर्ग रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन 14 एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. सीएनबीसी-टीव्ही 18ला मिळालेल्या माहितीनुसार सरकार लॉकडाऊनमधून (Lockdown) अंशतः सूट देऊ शकते. या आठवड्याच्या अखेरीस याबाबत सरकार अंतिम निर्णय घेणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 80 टक्के उत्पादन 82 जिल्ह्यांमध्ये केले जाते आणि सरकार तेथे नियंत्रित पद्धतीने उत्पादन सुरू करण्याची परवानगी देऊ शकते. ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप कोरोना व्हायरसचा (Coronavirus) एकही रुग्ण सापडलेला नाही, त्या जिल्ह्यांमधून सरकार लॉकडाउन हटविण्याचा निर्णय घेऊ शकते.
#CNBCTV18Exclusive | Govt mulls partial opening of amber/green zones with adherence to Section 144 Of CrPC; feels that the schools, colleges, religious places, malls, cinema theatres etc should remain closed till May 31: Sources pic.twitter.com/thB8lGaqMi
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार आंशिक लॉकडाऊन हटविण्यावर विचार करीत आहे. ज्या ठिकाणी कोरोनाव्हायरसचा संसर्ग कमी आहे, तेथे सरकार कलम 144 सह काही सवलत देऊ शकते. शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, मॉल, सिनेमा हॉल यासारखी ठिकाणे 31 मेपर्यंत बंद ठेवली जावीत यावर विचार केला जात आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाव्हायरसचा एकही रुग्ण सापडला नाही, सरकार तेथे कारखाने सुरू करण्याची परवानगी देऊ शकते.
लॉकडाऊन संपल्यानंतरही उद्योगांना पुन्हा सुरळीत होण्यास बराच अवधी लागू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. वाहनांच्या पार्टची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या मते, पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याने आणि कामगारांच्या टंचाईमुळे उत्पादन सुरू होण्यास सुमारे 2 महिन्यांचा काळ लागू शकतो. विमान वाहतूक आणि निर्यात क्षेत्रांचंही असंच मत आहे.
वाहन उद्योगाशी संबंधित तज्ज्ञांनुसार, लॉकडाऊन संपल्यानंतर 2 महिन्यांपर्यंत वाहन कंपन्यांच्या उत्पादनात व्यत्यय येऊ शकतो. SIAM आणि ACMA हे त्यांच्या सदस्यांसाठी नवीन प्रोटोकॉल तयार करीत आहेत. सुरुवातीला वाहन कंपन्यांना 20-30 टक्के कामगारांसह काम करावं लागण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे अर्थव्यवस्था सांभळत असताना सरकार व्यावसायिकांसाठी कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगबाबत मार्गदर्शक सूचना देखील आणू शकते. मारूती, ह्युंदाई यांना काम सुरू करण्यासाठी सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. मोठ्या कंपन्या डीलर्स समर्थन प्रोग्राम आणत आहेत. यामध्ये सध्याची परिस्थिती पाहता ऑटो कंपन्या डिजिटल विक्रीवर भर देतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन संपल्यानंतरही एव्हिएशन क्षेत्रात विमानांची संख्या 650 वरून 200-250 पर्यंत कमी केली जाऊ शकते. एअर इंडिया वगळता इतर विमान कंपन्या बुकिंग घेत आहेत.
आयात आणि निर्यातीवर परिणाम
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आयात आणि निर्यातीचे 35% ऑर्डर रद्द झाले आहेत आणि नवीन ऑर्डर येत नाहीत. अशा परिस्थितीत लॉकडाउन संपल्यानंतर बंदरे / विमानतळांवर अडकलेल्या वस्तू सोडविण्यावर लक्ष दिले जाऊ शकते.