मुंबई 21सप्टेंबर : नोकरदार व्यक्तींच्या मासिक वेतनाचा काही भाग एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड (EPF) अर्थात कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीमध्ये जमा होतो. खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या PF चं व्यवस्थापन EPFO अर्थात कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेतर्फे केलं जातं. ईपीएफओ खात्यामध्ये जमा होणारी रक्कम ही भविष्यासाठी मोठी पुंजी असते. रिटायर झाल्यानंतर पीएफचे सारे पैसे संबंधित कर्मचाऱ्याला मिळतात. ईपीएफओचा व्याजदर सर्वसाधारणपणे अन्य गुंतवणूक संस्थांपेक्षा जास्त असतो आणि इथे केलेली गुंतवणूक पूर्णतः जोखीममुक्त असते. कर्मचाऱ्यांना पीएफच्या रकमेवर व्याज देण्यासाठी ईपीएफओ अनेक ठिकाणी या पैशांची गुंतवणूक करते. त्याद्वारे कर्मचाऱ्यांचं भविष्य सुरक्षित केलं जातं. त्यासोबतच ही ईपीएफओतर्फे मोफत सात लाख रुपयांचा इन्शुरन्सही कर्मचाऱ्यांना दिला जातो. हा इन्शुरन्स एम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड स्कीमच्या अंतर्गत दिला जातो. कोणत्याही पीएफ खातेधारकाचा दुर्घटनेत मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला ईपीएफओद्वारे सात लाख रुपयांपर्यंतचा निधी विमा म्हणून दिला जातो. EDLI योजना म्हणजे काय? EDLI म्हणजे इम्प्लॉयी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ची EDLI ही योजना कर्मचाऱ्यांना सोशल सिक्युरिटी देण्यास हातभार लावते. कर्मचारी नोकरी करत असताना त्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंबीय किंवा त्याच्या अधिकृत वारसदाराला कर्मचाऱ्याच्या 12 महिन्यांच्या वेतनाच्या 35 पट रक्कम दिली जाते. ती जास्तीत जास्त 7 लाख रुपयांपर्यंत असू शकते. 1976मध्ये ईपीएफओकडून EDLI ही योजना सुरू करण्यात आली. संबंधित कर्मचाऱ्याने मृत्यूपूर्वी किमान 12 महिने एका किंवा एकाहून अधिक संस्थांमध्ये काम केलेलं असणं म्हणजेच तेवढा काळ ईपीएफओचा सदस्य असणं बंधनकारक आहे. तसं असेल तरच त्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला ही विमा रक्कम दिली जाते. ‘EDLI योजना 2022’ अंतर्गत कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या मासिक वेतनाच्या 0.5 टक्के एवढं अंशदान केलं जातं. पीएफ खात्यामध्ये जमा होणाऱ्या एकूण रकमेपैकी 8.33 टक्के भाग EPSमध्ये, 3.67 टक्के भाग EPFमध्ये तर 0.5 टक्के भाग EDLIमध्ये जमा होतो. EPF आणि EPS या योजनांचा लाभ बहुतांश किंबहुना सर्वच जण घेतात; मात्र EDLI या योजनेची माहिती फार कमी जणांना असते. खात्याला नॉमिनी हवा आपल्या EPF खात्यात नॉमिनीचं नाव देण्याची किंवा अपडेट करण्याची सूचना ईपीएफओकडून वारंवार आपल्या खातेधारकांना दिली जाते. खात्याला नॉमिनीचं नाव दिलेलं असण्याचा फायदा हा असतो, की एखाद्या खातेधारकाचा मृत्यू झाला, तर अशा कठीण परिस्थितीत त्याच्या कुटुंबीयांना EPF, EPS, EDLI या योजनांचा लाभ घेण्यात कोणतीही अडचण येत नाही. कोणत्याही कारणाने खातेधारकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या खात्यातले पैसे, तसंच इन्शुरन्सची रक्कम नॉमिनीला अगदी सहजपणे मिळते. खात्याला नॉमिनीचं नाव दिलेलं नसेल, तर मात्र ती प्रक्रिया किचकट होते. अशा परिस्थितीत संबंधित खातेधारकाच्या सर्व उत्तराधिकाऱ्या सह्या, तसंच कायदेशीर वारसांची सक्सेशन सर्टिफिकेट्स सादर केल्यानंतर संबंधितांना हे पैसे मिळू शकतात. EDLI योजनेविषयी माहिती कोणत्याही खातेधारकाला या EDLI योजनेअंतर्गत कमीत कमी 2.5 लाख आणि जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचा इन्शुरन्स क्लेम मिळू शकतो. अडीच लाख रुपयांपर्यंतचा क्लेम प्राप्त करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने मृत्यूपूर्वी सलग आणि किमान 12 महिने नोकरी केलेली असणं आवश्यक आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने मध्येच नोकरी सोडली असल्यास त्याच्या वारसांना हा इन्शुरन्स क्लेम करता येणार नाही. या स्कीमसाठी 0.5 टक्के योगदान कंपनीकडून केलं जातं. इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी नॉमिनी ईपीएफओच्या ऑफिसमध्ये किंवा अधिकृत ऑनलाइन वेबसाइटवर जाऊन क्लेम करू शकतात. योजनेचा उद्देश ईपीएफओअंतर्गत येणाऱ्या सक्रिय कर्मचाऱ्यांपैकी कोणाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक साह्य म्हणून विमा रक्कम देणं हा या योजनेचा उद्देश आहे. त्या आर्थिक मदतीतून संबंधित कुटुंबीय आपला उदरनिर्वाह काही काळ चालवू शकतात आणि कठीण परिस्थितीत तग धरून राहू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.