Home /News /money /

चिनी कंपनी 'Vivo'च्या भारतातील 40 मालमत्तांवर 'ईडी'ची छापेमारी, कारवाईचं नेमकं कारण काय?

चिनी कंपनी 'Vivo'च्या भारतातील 40 मालमत्तांवर 'ईडी'ची छापेमारी, कारवाईचं नेमकं कारण काय?

'ईडी'ने खटला दाखल केलेली व्हिवो ही दुसरी मोठी चिनी कंपनी ठरली आहे. याआधी Xiaomi या चिनी मोबाइल उत्पादक कंपनीवर 'ईडी'ने खटला दाखल केला होता.

    नवी दिल्ली, 5 जुलै : एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट अर्थात ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाने व्हिवो (Vivo) या चिनी मोबाइल उत्पादक कंपनीच्या (Chinese Mobile Manufacturer Company) भारतातल्या ठिकठिकाणच्या कार्यालयांवर छापे टाकले. मंगळवारी (5 जुलै) व्हिवोच्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि काही दाक्षिणात्य राज्यांतल्या अशा एकूण 40 कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले. या कंपनीविरोधात मनी लाँडरिंग (Money Laundering) अर्थात आर्थिक घोटाळ्याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. त्या संदर्भात तपासासाठी (Raids for Investigation) हे छापे टाकण्यात आल्याचं समजतं. 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 'व्हिवो'च्या नेमक्या कोणत्या संभाव्य गुन्ह्यामुळे 'ईडी'ने हा तपास सुरू केला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही; मात्र 2020 मध्ये मेरठ पोलिसांनी व्हिवो कंपनीविरोधात फसवणुकीचा (Fraud Case) एक खटला दाखल केला होता. एकाच IMEI नंबरचे जवळपास 13 हजार 500 फोन्स देशात वितरित केल्याचा आरोप व्हिवो कंपनीवर ठेवण्यात आला होता. इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी अर्थात IMEI हा 15 आकडी नंबर प्रत्येक स्मार्टफोनला असतो आणि तो युनिक अर्थात एकमेवाद्वितीय असतो. थोडक्यात, प्रत्येक स्मार्टफोनचा IMEI वेगळा असतो. तसा तो नसल्यास 3 वर्षांच्या तुरुंगवासापर्यंतची शिक्षा मिळू शकते, असं टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटीने (TRAI) 2017 साली जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने 'ईडी'ने आता छापे टाकले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 'ईडी'ने खटला दाखल केलेली व्हिवो ही दुसरी मोठी चिनी कंपनी ठरली आहे. याआधी Xiaomi या चिनी मोबाइल उत्पादक कंपनीवर 'ईडी'ने खटला दाखल केला होता. अवैध आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार करून फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्टचं (FEMA) उल्लंघन केल्याचा आरोप त्या कंपनीवर ठेवण्यात आला होता. Xiaomi India ही चीनमधल्या Xiaomi ग्रुपच्या पूर्णतः मालकीची असलेली छोटी कंपनी आहे. एप्रिल महिन्यात 'ईडी'ने FEMA कायद्यातल्या तरतुदींच्या आधारे Xiaomi Technology India Private Limited या कंपनीच्या बँक खात्यांमधली 5555.27 कोटी रुपये एवढी रक्कम जप्त केली. कंपनीने यंदा फेब्रुवारी महिन्यात केलेल्या बेकायदा आर्थिक व्यवहारांचा तपास 'ईडी'ने सुरू केला. एप्रिल महिन्यात कंपनीने Xiaomi चे जागतिक उपाध्यक्ष मनूकुमार जैन यांची चौकशीही केली होती. Xiaomi ही कंपनी MI या ब्रँड नेमने भारतात मोबाइल फोन्सचा व्यापार करते. Xiaomi India ही कंपनी पूर्णतः तयार केलेले मोबाइल सेट्स आणि अन्य प्रॉडक्ट्स भारतातल्या मॅन्युफॅक्चरर्सकडून घेते. तरीही कंपनीने कोणतीही सेवा न घेतलेल्या दोन अमेरिकी आणि एका चिनी अशा तीन परदेशी कंपन्यांना 5551.27 कोटी रुपयांचं परकीय चलन पाठवलं. कंपनीने रॉयल्टी म्हणून ही रक्कम पाठवली होती. हे FEMA कायद्याच्या चौथ्या सेक्शनचं उल्लंघन आहे. तसंच, कंपनीने हे पैसे पाठवताना बँकांनाही दिशाभूल करणारी माहिती दिली होती, असं 'ईडी'ने आपल्या पत्रकात म्हटलं होतं.
    First published:

    Tags: Central government, Vivo

    पुढील बातम्या