मुंबई, 20 मार्च : घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात (Diesel Price Hike) प्रतिलिटर 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात ग्राहकांना विकले जाणारे डिझेल प्रतिलिटर 25 रुपयांनी महागले असल्याचे सूत्रांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (cruid Oil) किमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, पेट्रोल पंपांवरून विकल्या जाणाऱ्या डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही बदल झालेला नाही. या महिन्यात पेट्रोल पंपांच्या विक्रीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बस फ्लीट ऑपरेटर आणि मॉल्ससारख्या मोठ्या ग्राहकांनी पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदी केले आहे. सहसा ते थेट पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन घेतात. यामुळे इंधन रिटेलिंग कंपन्यांचा तोटा वाढला आहे. नायरा एनर्जी, जिओ-बीपी आणि शेल या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. विक्रीत वाढ होऊनही या कंपन्यांनी अद्याप प्रमाण कमी केलेले नाही. पण आता पंप चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. या प्रकरणाची माहिती असलेल्या तीन सूत्रांनी सांगितले की, इंधनाच्या किमती विक्रमी 136 दिवसांपासून वाढल्या नसल्यामुळे, कंपन्यांनी या दरांवर अधिक इंधन विकण्याऐवजी पेट्रोल पंप बंद करणे हा अधिक व्यावहारिक पर्याय असेल. 2008 मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजने विक्री ‘शून्य’ वर आल्यानंतर त्यांचे सर्व 1,432 पेट्रोल पंप बंद केले. आजही तीच परिस्थिती असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात ग्राहक पेट्रोल पंपावरून खरेदी करत आहेत. त्यामुळे या किरकोळ विक्रेत्यांच्या तोट्यात वाढ होत आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात ग्राहकांसाठी डिझेलची किंमत 122.05 रुपये प्रति लिटर झाली आहे. पेट्रोल पंपांवर 94.14 रुपये प्रति लिटर दराने डिझेल विकले जात आहे. बिस्किट खाणे महागणार, FMCG कंपन्या 10 टक्क्यांपर्यंत दर वाढवण्याच्या तयारीत त्याचप्रमाणे दिल्लीतील पेट्रोल स्टेशनवर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे, तर घाऊक किंवा औद्योगिक ग्राहकांसाठी त्याची किंमत 115 रुपये प्रति लिटर आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी 4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केलेली नाही. मात्र, या काळात जागतिक स्तरावर इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली नसल्याचे मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी आले आहेत, मात्र त्यानंतरही संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू असल्याने तूर्त भाव वाढलेले नाहीत. घाऊक ग्राहकांचे दर आणि पेट्रोल पंपाच्या दरात 25 रुपयांची मोठी तफावत असल्याने घाऊक ग्राहक पेट्रोल पंपावरून इंधन खरेदी करत आहेत. ते थेट पेट्रोलियम कंपन्यांकडून टँकर बुक करत नाहीत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा आणखी वाढला आहे. नायरा एनर्जीने या संदर्भात पाठवलेल्या ई-मेलला प्रतिसाद दिला नाही. जिओ-बीपीने सांगितले की रिटेल आउटलेटवर मागणीत मोठी वाढ झाली आहे. किरकोळ आणि औद्योगिक दरात प्रतिलिटर 25 रुपयांची तफावत असल्याने घाऊक ग्राहकही किरकोळ पेट्रोल पंपांवरून खरेदी करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.