मुंबई, 1० नोव्हेंबर: सरकारनं निश्चित केलेल्या एका ठराविक रकमेपेक्षा आपलं वार्षिक उत्पन्न जास्त असेल तर इन्कम टॅक्स भरावा लागतो. इन्कम टॅक्स रिटर्नबाबत टॅक्सपेअर्सच्या मनांत अनेक प्रश्न असतात. विशेषत: शेअर बाजारातील ट्रेडर्स आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी, टॅक्स भरणं म्हणजे एक मोठं कामच आहे. त्यांना आयटीआर भरण्यासाठी लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजेच दीर्घकालीन भांडवली नफ्याचा स्क्रिप्टनुसार अहवाल तयार करावा लागतो. लॉन्ग टर्म कॅपिटल गेनसाठी संपूर्ण आर्थिक वर्षात केलेल्या ट्रेडिंगची माहिती 112ए शेड्युलनुसार भरावी लागते. याशिवाय जे लोक फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये काम करतात त्यांच्यासाठी तर ITR-3 किंवा ITR-4 मध्ये माहिती देणं जास्तच अधिक कठीण आहे. मात्र, लवकरच सर्व टॅक्स पेअर्सची या कटकटीतून सुटका होणार आहे. लवकरच सर्व करदाते एकाच आयटीआर फॉर्मद्वारे आयकर रिटर्न भरू शकतील. अर्थ मंत्रालयाने सर्व करदात्यांसाठी कॉमन इन्कम टॅक्स फॉर्मचा प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावाबाबत, अर्थ मंत्रालयाने 15 डिसेंबर 2022 पर्यंत संबंधितांकडून सूचना मागवल्या आहेत. 2023-24 च्या अर्थसंकल्पात एका कॉमन आयटीआर फॉर्मची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयटीआर फॉर्म्सचे 7 प्रकार- 1.आयटीआर फॉर्म क्रमांक 1: ज्यांचं वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत असते, त्या व्यक्ती पहिल्या क्रमांकाचा आयटीआर फॉर्म भरतात. पगार, मालमत्ता, व्याजातून मिळणारं उत्पन्न, लाभांशातून मिळणारं उत्पन्न आणि शेतीतून मिळणारं वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत असलं पाहिजे. तरच हा फॉर्म भरता येतो. 2. आटीआर फॉर्म क्रमांक 2: म्युच्युअल फंड, स्टॉक यांसारख्या मालमत्तेच्या विक्रीतून भांडवली नफा मिळाला असेल किंवा एकापेक्षा जास्त घरांच्या स्वरुपात मालमत्ता असेल, तर अशा करदात्यांना दुसऱ्या क्रमांकाचा आयटीआर फॉर्म भरावा लागतो. 3. आटीआर फॉर्म क्रमांक 3: ज्या व्यक्ती आणि अविभक्त हिंदू कुटुंबांना (HUF) व्यवसायातून कमाई आणि नफा मिळतो, त्यांना तिसऱ्या क्रमांकाचा फॉर्म भरावा लागतो. 4. आटीआर फॉर्म क्रमांक 4: ITR-4 ला सुगम म्हणूनही ओळखलं जातं. ज्या व्यक्ती आणि अविभक्त हिंदू कुटुंबांचं (एलएलपी व्यतिरिक्त) व्यवसायातून मिळणारं एकूण उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत आहे, अशांना हा आयटीआर फॉर्म क्रमांक लागू होतो. ज्या व्यक्ती कंपनीत संचालक आहेत, ज्यांनी असूचीबद्ध इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे, ESOP वर आयकर स्थिगित केला आहे किंवा ज्यांचं कृषी उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशांसाठी हा फॉर्म उपयुक्त नाही. हेही वाचा: FDमध्ये पैसे गुंतवायचा विचार करताय? मग RBIनं बदललेला हा नियम आजच घ्या समजून, नाहीतर… 5. लिमिटेड लायबिलिटी पार्टनशीपसाठी आटीआर फॉर्म क्रमांक 5, बिझनेस इन्कमसाठी आटीआर फॉर्म क्रमांक 6 आणि ट्रस्टसाटी आटीआर फॉर्म क्रमांक 7 वापरला जातो. 6. सध्या विविध श्रेणींतील करदात्यांसाठी वरील सात प्रकारचे आयटीआर फॉर्म उपलब्ध आहेत. पण, अर्थ मंत्रालयाने आता सर्व करदात्यांना एकच आयटीआर फॉर्म देण्याचा प्रस्ताव आणला आहे. आयटीआर फॉर्म क्रमांक 7 वगळता, इतर सर्व फॉर्म एकत्र केले जातील. 7. सीबीटीडीनुसार, कॉमन आयटीआरद्वारे आयकर रिटर्न भरणं करदात्यांना सोपं जाईल. करदात्यांचा आणि बिगर व्यावसायिक प्रकारच्या करदात्यांचा वेळ वाचेल. ट्रस्ट आणि नॉन-प्रॉफिट संस्था वगळता, इतर सर्व करदाते आयकर रिटर्न भरण्यासाठी कॉमन आयटीआर वापरू शकतील. सीबीडीटीनं दिलेल्या माहितीनुसार, आयटीआर फॉर्म क्रमांक-1 आणि आयटीआर फॉर्म क्रमांक-4 सुरू राहतील. परंतु, करदात्यांना कॉमन आयटीआरद्वारे आयकर रिटर्न भरण्याचा पर्याय उपलब्ध असेल. याशिवाय, अधिसूचना जारी झाल्यानंतर, आयटीआर फॉर्म क्रमांक-2 आणि आयटीआर फॉर्म क्रमांक-3 द्वारे रिटर्न भरणारे करदाते फक्त कॉमन आयटीआर फॉर्मद्वारेच रिटर्न भरू शकतील.
करदात्यांवर काय परिणाम होईल दोन वर्षांपूर्वी, आयकर रिटर्न भरण्यासाठी नवीन ई-फायलिंग वेबसाइट आली. त्यामुळे ऑनलाइन रिटर्न भरण्यासाठी करदात्यांना अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या. आता कॉमन आयटीआर फॉर्म सुरू झाला की, करदात्यांना रिटर्न भरण्याच्या नवीन पद्धतीपासून सर्वकाही पुन्हा शिकावं लागेल. तसेच, रिटर्न भरताना करदात्यांना अनेक नवीन निर्णय घ्यावे लागतील. उदाहरणार्थ, जुन्या आयटीआर फॉर्मद्वारे रिटर्न भरायचा की कॉमन आयटीआरची निवड करायची. कर विभाग सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहे. सर्वात अगोदर प्री-फिल्ड आयटीआर फॉर्म सुरू केला गेला. कॉमन आयटीआर फॉर्म हा सुद्धा याच प्रयोगांचा एक भाग आहे.