मुंबई: CNG च्या दरात पुन्हा बदल झाले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये आजपासून नवे दर लागू होणार आहेत. राजधानी दिल्लीत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 95 पैशांची वाढ करण्यात आली आहे. नवीन किंमत 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होईल. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (आयजीएल) ही वाढ जाहीर केली आहे. दिल्लीत आता एक किलो सीएनजी भरण्यासाठी 79.56 रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी 8 ऑक्टोबरला दिल्लीत सीएनजीच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. गेल्यावेळी दिल्लीत सीएनजीच्या दरात प्रति किलो 3 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर दिल्लीत सीएनजीची किंमत 78.61 रुपये प्रति किलो झाली आहे. गुरुग्राममध्ये सीएनजी 86.94 रुपये प्रति किलो, गाझियाबाद, नोएडा-ग्रेटर आणि नोएडा 81.17 रुपये किलो, रेवाडी 78.61 रुपये प्रति किलो आणि फरीदाबाद 84.19 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. यंदा मार्चनंतर पंधरावेळा जवळपास सीएनजीचे दर वाढले आहेत. एकूण 10 महिन्यात सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 23.55 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सीएनजीचा भाव 36.16 रुपये प्रति लिटर होता, जो आता दिल्लीत 80 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल जागतिक परिस्थितीमुळे हा प्रकार घडल्याचे मानले जाते. त्याचबरोबर सीएनजीचे दर आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. एप्रिल 2021 पासून सीएनजीच्या किंमतीत सुमारे 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
याचा फटका खासगी चालकांना बसतोच, शिवाय कॅब सेवा वापरणाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. आधीच ओला, उबेरसारख्या कॅब कंपन्यांनी आपल्या किमान भाड्यात भरघोस वाढ केली होती आणि आता या दरवाढीनंतर पुन्हा एकदा भाडेवाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जे लोक ऑफिसला जाण्यासाठी दररोज कॅब किंवा ऑटोने प्रवास करतात, त्यांच्या खिशावरचा भार वाढू शकतो.