मुंबई, 11 मे : भारतातील दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील व्यावसायिक बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) ने काही नियम बदलले आहेत. तुमचे खाते देखील PNB असेल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. बँकेने मल्टिसिटी चेकबुक, वर्षभरातील मोफत व्यवहारांची संख्या, लॉकर भाडे शुल्क, बचत खात्यातील मासिक मोफत व्यवहारांपर्यंत अनेक बदल केले आहेत. पंजाब नॅशनल बँक नॉन-क्रेडिट संबंधित सेवा शुल्क देखील बदलणार आहे. यासोबतच बँकेने फ्री चेक लीफची संख्याही कमी केली आहे. नवीन नियमांमुळे बँकेच्या ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त शुल्क भरावे लागणार आहे. बँकेने नवीन नियमांमध्ये काय बदल केले आहेत ते जाणून घेऊया.
चेक रिटर्न चार्ज
पंजाब नॅशनल बँकेने चेक रिटर्न चार्ज बदलले आहे. बँकेने 10 लाख रुपयांच्या आऊटवर्ड रिटर्निंग शुल्कासाठी नवीन स्लॅब आणला आहे. 10 लाख रुपयांच्या आऊटवर्ड रिटर्निंग शुल्कासाठी प्रति इन्स्ट्रुमेंट 500 रुपये द्यावे लागतील. याआधी 1 लाख रुपयांच्या वरच्या इन्स्ट्रुमेंटसाठी 250 रुपये आकारले जात होते.
Business Idea: खर्च कमी, उत्पन्न जास्त; कोरफडीची लागवड करून कमवा 5 पट नफा
आउटस्टेशन चेक रिटर्निंग
बँकेने आऊटस्टेशन चेक परत करण्याच्या नियमातही बदल केले आहेत. आता प्रति इन्स्ट्रुमेंट 150 रुपये दराने 1 लाख रुपयांपर्यंतचे शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय एक लाख ते 10 लाखांपर्यंत प्रति इन्स्ट्रुमेंट 250 रुपये मोजावे लागतील.
त्याचप्रमाणे पीएनबी हाउसिंग फायनान्सने कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. गृहकर्जासोबतच इतर किरकोळ कर्जावरील व्याजदरात 35 बेसिक पॉईंट्सने म्हणजेच 0.35 टक्के वाढ करण्यात आली आहे.
लॉकर भाड्याचा दंड
पंजाब नॅशनल बँकेने लॉकर भाड्याच्या दंडाच्या रकमेत सुधारणा केली आहे. नवीन नियमांनुसार, एक वर्षापर्यंत विलंब झाल्यास वार्षिक भाड्याच्या 25 टक्के दंड आकारला जाईल. याशिवाय एक वर्ष ते तीन वर्षांचा विलंब केल्यास वार्षिक भाड्याच्या 50 टक्के दंड आकारला जाईल. त्याच वेळी, 3 वर्षांपेक्षा जास्त विलंब झाल्यास, बँक लॉकर तोडले जाईल.
पीएनबीने मोफत चेक लीफची संख्याही कमी केली आहे. यापूर्वी बचत खातेधारकांना एका आर्थिक वर्षात 25 पाने असलेले चेकबुक दिले जात होते. नवीन नियमांनुसार आता 29 मे पासून 20 पाने असलेले चेकबुक मोफत मिळणार आहे.
मोफत व्यवहार मर्यादा निश्चित
बँकेने आर्थिक वर्षात एकूण डेबिट व्यवहार मर्यादा निश्चित केली आहे. आता 50 मोफत डेबिट व्यवहारांनंतर, ग्राहकांना प्रत्येक व्यवहारावर 10 रुपये आकारले जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.