मुंबई, 11 जून: कोविड महामारीतील लॉकडाउनने (Covid-19 Lockdown) जसे अनेकांचे प्राण हिरावले तसेच अनेकांची रोजीरोटीही हिरावून घेतली. उद्योगधंदे बंद झाले आणि हातावर पोट असलेल्याच काय पण नोकरदार वर्गातील नागरिकांनाही दिवस कंठणं मुश्किल होऊन बसलं. त्यानंतर जेव्हा पुन्हा सगळं जग उभं राहू लागलं तेव्हा नोकरी गेलेल्या अनेकांनी व्यवसाय करण्याचा पक्का निश्चय केला. नवे कुटीर उद्योग, उद्योगही सुरू झाले. त्यामुळे सर्वांनाच व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळाली. आजही अनेकजण नव्या व्यवसायासाठी आयडिया (Business Idea) शोधत असतात. अशा मंडळींसाठी आम्ही एक आयडिया आज सांगणार आहोत.. भारतात अनेक झाडांच्या, वृक्षांच्या पानांचा वापर दैनंदिन जीवनात केला जातो. तसंच ती पानं धार्मिक विधींमध्येही वापरली जातात. त्यामुळे या पानांच्या उत्पादन आणि विक्रीचा व्यवसायही खूप मोठा आहे. केळी, साल आणि खाऊची म्हणजे विड्याची पानं या तीन पानांचा व्यवसाय हा रोजगाराचं एक मोठं साधन आहे. त्यात कमाई पण चांगली होते. दक्षिण भारतात (South India) केळाच्या पानांवरच जेवण वाढलं जातं. त्यामुळे केळाच्या पानांना मोठी मागणी असते. तर या तिन्ही पानांच्या व्यवसायाबद्दल अधिक जाणून घेऊ या. केळीची पानं हिंदू संस्कृतीत पूजा विधींना खूप महत्त्व आहे. त्यावेळी केळाच्या पानांचा उपयोग केला जातो. केळीच्या पानांपासून (Banana Leaves) जेवणाची ताटं तयार केली जाऊ शकतात. दक्षिण भारतातील लग्नात किंवा एखाद्या देवस्थानच्या प्रसादालयात तुम्हाला केळीच्या पानांवरच अन्न वाढलं जातं. घरांतही अजून मोठ्या प्रमाणात जेवणाचं ताट म्हणून केळीच्या पानांचाच वापर केला जातो. त्यामुळे केळीच्या पानांना खूप मोठी मागणी आहे. केळीची लागवड करून केळांबरोबर पानंही विकून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. सालाची पानं सालाचा वृक्ष (Sal Leaves) सामान्यपणे डोंगराळ भागांत आढळतो. उत्तर भारतातल्या जवळजवळ सगळ्याच जंगलांत हा वृक्ष आढळतो. हा वृक्ष प्रचंड उंच असतो आणि त्याची पानं पसरट असतात. सालाचं लाकूडही खूप मोठ्या किमतीला विकलं जातं. सालाच्या पानांपासून मुळांपर्यंतच्या भागांचा विविध पद्धतीने वापर केला जातो त्यामुळे त्यांना चांगली किंमत येते. ही पानं लग्नाच्या विधींत वापरली जातात तसंच त्यांपासून पत्रावळी, द्रोण तयार केले जातात. त्यामुळे या सालाच्या पानांचा व्यवसाय लाखोंची कमाई करून देऊ शकतो. विड्याची पानं विड्याचं पान (Beetle Leaves) माहीत नाही अशी व्यक्ती विरळाच. हिंदू धर्मात अनेक पूजांमध्ये मांडणी करताना विड्याचं पान वापरलं जातं. त्याचबरोबर भारतातील सर्वांत प्रसिद्ध मुखशुद्धीचा प्रकार म्हणून हे विड्याचं पानच खाल्लं जातं. उत्तर (North India) असो वा दक्षिण, पूर्व असो वा पश्चिम भारत सगळीकडे जेवणानंतर विड्याचं पान खाण्याची पद्धत रूढ आहे. त्यामुळे कुठल्याही गावाच्या बाजारात गेलात तर 12 महिने विड्याची पानं विकत मिळतात. याची मागणी जबरदस्त असल्याने त्याचा व्यवसाय केला तर प्रचंड कमाई होऊ शकते. या पानांची लागवड करायला सरकार अनुदानही (Government Subsidy) देतं. या पानांचं पीक घेऊन विकलं तर लाखो रुपयांची कमाई करणं सोपं आहे. या तीन पानांचं उत्पादन, विक्री करून तुम्ही तुमचा चांगला व्यवसाय उभा करू शकता. त्यामुळे मोठी कमाईही होईल आणि दुसऱ्यावर अवलंबूनही रहावं लागणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.