मुंबई, 1 नोव्हेंबर: केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग महागाईनं त्रस्त आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. मागणी आणि पुरवठ्यात इतकी मोठी तफावत निर्माण झाली आहे की अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्यानं वाढत आहेत. या संकटाचा भारतही सामना करत आहे. सप्टेंबरमध्ये महागाई दर 7.40 टक्के नोंदवण्यात आला. अनेक महिन्यांपासून महागाई सातत्यानं वाढत आहे. भारताशिवाय युरोपातील अनेक देशांमध्ये महागाईचा दर 10 टक्क्यांच्या वर आहे. एका अहवालानुसार, युरो चलन वापरणाऱ्या 19 युरोपीय देशांमध्ये चलनवाढीचा दर ऑक्टोबरमध्ये 10.7 टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.
नैसर्गिक वायू आणि विजेच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे अर्थव्यवस्थेचा वेगही मंदावला आहे. तेलाच्या किमती आधीच कमी झाल्या आहेत, पण इतर काही कारणांमुळे त्याचा फायदा ग्राहकांना मिळत नाहीये. अलीकडेच, ओपेक देशांच्या संघटनेनं म्हटलं आहे की ते कच्च्या तेलाचा पुरवठा कमी करणार आहेत. या घोषणेनंतर जगभरात तेलाच्या किमती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे रशिया बहुतेक नैसर्गिक वायू युरोपियन देशांना पुरवतो. मात्र युद्धामुळे यामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला असून त्यामुळे गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आकडे काय सांगतात?-
युरोपियन युनियन (EU) सांख्यिकी संस्था 'युरोस्टॅट' ने सोमवारी ऑक्टोबर महिन्याची आकडेवारी जाहीर केली असून, एका वर्षापूर्वीच्या तुलनेत या महिन्यात महागाईचा दर 10.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. याआधी सप्टेंबरमध्ये महागाई दर 9.9 टक्के होता. 1997 नंतर युरोझोनमधील महागाईचा हा उच्चांक आहे. युरोपियन युनियनच्या 28 पैकी 19 देशांमध्ये युरो चलन वापरले जाते. त्यांना एकत्रितपणे युरोझोन म्हणतात.
हेही वाचा: Rule Chage: 1 नोव्हेंबरपासून 5 मोठे बदल, थेट तुमच्या आयुष्यावर करणार परिणाम
युरोस्टॅटने सांगितले की, रशिया-युक्रेन युद्धामुळे नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली वाढ आणि विजेच्या किमतीत झालेली वाढ महागाई वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. ऊर्जा संसाधनावरील खर्चात वाढ झाल्यामुळे ग्राहकांचा इतर आवश्यक गोष्टींवरील खर्च कमी झाला आहे. युरोस्टॅटच्या मते, अन्न, अल्कोहोल आणि तंबाखू उत्पादनांच्या किंमती 13.1 टक्क्यांनी वाढल्या आहेत, तर ऊर्जा संसाधनांच्या किमती 41.9 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
विकास दर शून्याच्या जवळ -
दरम्यान कोविड-19 महामारीच्या दुष्परिणामातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या युरोपीय देशांच्या अर्थव्यवस्थांनी जुलै-सप्टेंबर या तिमाहीत केवळ ०.2 टक्के विकास दर गाठला आहे. यापूर्वी एप्रिल-जून तिमाहीत विकास दर 0.8 टक्के होता. युरोपियन सेंट्रल बँकेने गेल्या आठवड्यात एका अंदाजात म्हटलं आहे की पुढील वर्षी महागाई दर 5.8 टक्के असू शकते. तीन महिन्यांपूर्वी काढलेल्या अंदाजात ते 3.6 टक्के असल्याचं सांगण्यात आले होते. युरोपसह जगातील सर्व भागांत यंदा महागाईचा उच्चांक दिसून येत आहे. यूएस आणि यूकेमध्ये महागाईने गेल्या 40 वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Inflation