नवी दिल्ली, 10 जानेवारी : बँक कर्मचारी संघटनांनी (Bank Employee) संपाची (Strike) घोषणा केल्यामुळे फेब्रुवारी (February) महिन्यात दोन दिवस बँकांचं कामकाज ठप्प होणार आहे. बँक कर्मचारी 23 आणि 24 फेब्रुवारीला पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. सेंट्रल ट्रेड युनियन (Central Trade Union-CTU) आणि इतर संघटनांनी संयुक्तपणे संपाबाबत घोषणा केली आहे. या संपात देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाच्या केंद्रीय समितीनंदेखील (AIBEA) या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या संपाचा बँकेच्या नियमित कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही काळापासून बँकिंग कायदे (दुरूस्ती) विधेयक, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाच्या (Privatisation) सरकारच्या योजनेला विरोध दर्शवण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना आंदोलन करत आहेत. मागील महिन्यात पुकारण्यात आलेल्या संपामुळे बँकिंग संदर्भातील अनेक कामांवर परिणाम झाल्याचं दिसून आलं होतं. हा लढा लोकांचं जीवन आणि उपजीविका तसेच अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी : संघटना संघटनेचे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी सर्व संबंधित बँक असोसिएशन आणि सदस्यांना एक परिपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आणि या संपात सहभागी होण्यास सांगितलं आहे. ते म्हणाले की, ``युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने गेल्या वर्षी 15 आणि 16 मार्च रोजी दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाविरोधात आंदोलन केलं होतं. तसेच बँकिंग कायदे (दुरूस्ती) विधेयक 2021 च्या निषेधार्थ 16 आणि 17 डिसेंबर 2021 रोजी संप पुकारण्यात आला होता``. असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, हा लढा लोकांचं जीवन आणि उपजीविका तसेच अर्थव्यवस्था (Economy) वाचवण्यासाठी दिला जात आहे. Digital Gold Price Today: डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करावी का? काय आहे फायदा? बँकांच्या खासगीकरणाला विरोध सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाच्या सरकारच्या योजनेला विरोध करण्यासाठी बँक संघटनांनी गेल्या महिन्यात 16 आणि 17 डिसेंबर रोजी संप केला होता. एसबीआय, पीएनबी, सेंट्रल बँक आणि आरबीएल बँकांच्या दैनंदिन कामकाजावर या संपाचा परिणाम झाल्याचं दिसून आलं होतं. या संपामुळे चेक क्लिअरन्स (Check clearance), फंड ट्रान्सफर (Fund Transfer), डेबिट कार्डासंबधीची कामे रखडली होती. बँक कर्मचारी 23 आणि 24 फेब्रुवारीला पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. सेंट्रल ट्रेड युनियनसह अन्य संघटनादेखील या संपात सहभागी होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे हे दोन दिवस बँकांच्या शाखांमधील कामकाज ठप्प असेल. याचा परिणाम बँकिंगशी निगडित अनेक कामांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी या तारखांपूर्वीच बँकिंगविषयक महत्त्वाची कामं करावीत, असं सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.