नवी दिल्ली, 1 डिसेंबर: एटीएममधून रोख पैसे काढण्याच्या (Cash Withdrawal from ATM) नियमात बदल झाला आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) एटीएएममधून करण्यात येणारे व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी एक पाऊल उचललं आहे. त्यामुळे एसबीआय एटीएममधून (SBI ATM) दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी ओटीपीची (OTP) गरज असेल. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
देशातली सर्वांत मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने रोख व्यवहारांबाबत महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. हे नियम अशा व्यक्तींसाठी आहेत, की जे एटीएममधून 10,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढत आहेत. या नियमानुसार, तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम एटीएममधून काढत असाल तर त्यासाठी ओटीपीची गरज भासेल. ओटीपीमुळे ग्राहकाची फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ओटीपीच्या आधारे पैसे काढण्याला प्राधान्य दिलं जात आहे. एटीएम कार्डधारकाला दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल, तर त्याने रक्कम टाकल्यानंतर एटीएम स्क्रीनवर ओटीपी विंडो दिसेल. तेव्हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी ग्राहकाला नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी तेथे टाकावा लागेल.
बँकांच्या व्यवहारातली वाढती फसवणूक लक्षात घेऊन अशा प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत. स्टेट बँक त्यांच्या ग्राहकांसाठी वेळोवेळी अशा सेवेची घोषणा करत असते, जेणेकरून त्यांचे व्यवहार सुरक्षित आणि सुलभ व्हावेत. ओटीपीद्वारे पैसे काढणे, हादेखील त्याचाच एक भाग आहे. यासाठी बँक खात्यात नोंदणी केलेला मोबाइल क्रमांक पैसे काढताना तुमच्याकडे असला पाहिजे. कारण त्यावर ओटीपी येईल व तोच ओटीपी टाकून तुम्ही पैसे काढू शकाल.
एटीएममधून पैसे काढण्याची पडताळणी किंवा प्रमाणीकरण करण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांच्या पैशाची सुरक्षितता वाढते आणि पैसे चुकीच्या हातात जाण्यापासून रोखले जातात. ओटीपी आधारित रोख व्यवहार फक्त 10 हजारांपेक्षा जास्त रकमेसाठी आहेत, हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्यापेक्षा कमी पैसे काढल्यास एटीएममध्ये ओटीपी टाकण्याची गरज भासणार नाही.
एसबीआय त्यांच्या ग्राहकांना फसवणूक करणाऱ्यांपासून वाचवण्यासाठी सोशल मीडियावरून बँकेच्या सर्व उपक्रमांची आठवण करून देत आहे. गेल्या आठवड्यात बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, की 'एसबीआयच्या एटीएममधल्या व्यवहारांसाठी ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध एक प्रकारचं लसीकरणच आहे. फसवणुकीपासून ग्राहकांचं संरक्षण करणे याला नेहमीच आमचं सर्वोच्च प्राधान्य असेल.' बनावट किंवा अनधिकृत व्यवहारांची संख्या कमी करण्यासाठी 2020 मध्ये ओटीपी आधारित एटीएम व्यवहार सुरू करण्यात आला. ओटीपी-आधारित रोख पैसे काढण्याची सुविधा सुरू केल्यामुळे, स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या एटीएम सेवेद्वारे रोख पैसे काढण्यासाठी सुरक्षिततेचा आणखी एक स्तर जोडला आहे
दरम्यान, स्टेट बँकेचे कार्डधारक इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढतील तेव्हा ही सुविधा लागू होणार नाही. कारण नॅशनल फायनान्शियल स्विचमध्ये (NFS) हे काम अद्याप सुरू झालेलं नाही, असं एसबीआयने म्हटलं आहे. एनएफएस हे देशातलं सर्वांत मोठे इंटरऑपरेबल एटीएम नेटवर्क आहे. त्याद्वारे 95 टक्क्यांहून अधिक देशांतर्गत इंटरबँक एटीएम व्यवहार हाताळले जातात.
एसबीआयने आणलेल्या या सुविधेमुळे मात्र एटीएममधून दहा हजारांपेक्षा जास्त रक्कम काढणं अधिक सुरक्षित होणार आहे. या सुविधेमुळे ग्राहकांचा बँकेवरचा विश्वास आणखी वाढण्यास मदत होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM, Money, Money debt