Home /News /money /

एअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ

एअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ

सध्या एअर इंडिया या हवाई वाहतूक कंपनीनं (Air India) देशातील आपल्या काही मालमत्ता लिलावात (Auction) काढल्या आहेत. यात बांद्रयातील (Bandra) पाली हिल (Pali Hill) या उच्चभ्रू परिसरातील एका इमारतीचा समावेश आहे.

    मुंबई, 22 जून: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत (Mumbai) इमारतींसारखे जागेचे भावही गगनाला भिडले आहेत. मुंबईतल्या अशा अत्यंत महागड्या जागांची, घरांच्या व्यवहारांची चर्चा नेहमीच होत असते. सध्या एअर इंडिया या हवाई वाहतूक कंपनीनं (Air India) देशातील आपल्या काही मालमत्ता लिलावात (Auction) काढल्या आहेत. यात बांद्रयातील (Bandra) पाली हिल (Pali Hill) या उच्चभ्रू परिसरातील एका इमारतीचा समावेश असून, दोनवेळा विक्रीस काढूनही ही इमारत घेण्यास कोणीही ग्राहक पुढं येत नसल्यानं सर्वत्र चर्चा होत आहे. एअर इंडियानं  ई-लिलाव (E- Auction) जाहीर केला असून, त्यात या इमारतीसह अन्य काही इमारतींचाही समावेश आहे. बांद्रयातील पाली हिल परिसरात14 फ्लॅटस असलेली ही इमारत सुमारे 150 कोटी रुपये अपेक्षित किमान किमतीसह लिलावात विक्रीस काढण्यात आली आहे. घराची किंमत ठरताना तिचं ठिकाण महत्त्वाचं ठरतं. जितका मध्यवर्ती, सोयी सुविधायुक्त, उच्च वर्गातील लोकवस्तीचा परिसर तितकी तिथली किंमत अधिक असते. मुंबईत बॉलिवूड स्टार्सचं (Bollywood Stars) वास्तव्य असणाऱ्या किंवा उद्योजक, व्यावसायिक यांचं वास्तव्य असणाऱ्या परिसरात जागेच्या किंमती अफाट असतात. अशा काही परिसरांमध्ये जुहू, बांद्रा यांचा समावेश आहे. बांद्रयातील पाली हिल परिसरातही अनेक स्टार्सचं वास्तव्य आहे. अशा परिसरात ही इमारत आहे. साधारण 2006 चौरसमीटर जागेवर ही इमारत असून, 14 फ्लॅटसचे एकूण क्षेत्रफळ साधारण 2030 चौरस मीटर आहे. याची अपेक्षित किंमत साधाराण 150 कोटी आहे. लिलावात भाग घेण्यास इच्छुकांना आधी तीन कोटी रुपये अनामत स्वरूपात ठेवावे लागणार आहेत. 8 जुलै रोजी ऑनलाईन लिलाव सुरू होणार असून तो 9 जुलै रोजी संपेल. गेल्या वर्षीही ही इमारत याच किमतीला लिलावात विक्रीसाठी दाखल करण्यात आली होती; पण कोणीही तिची खरेदी करण्यास पुढं आलं नाही. यंदाही लिलावात तिचा समावेश असून, यावेळी कोणी ग्राहक तिच्या खरेदीसाठी पुढं येतो का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. हे ही वाचा-PAN Card हरवलंय? या वेबसाइटवरुन लगेच करा डाउनलोड, जाणून घ्या सोपी प्रोसेस याशिवाय एअर इंडियानं खार (Khar) परिसरातील सचिन दा स्ट्रेन्स (Sachin Da Strains) नावाच्या इमारतीतील 4 थ्या मजल्यावरील 114.10 चौरस मीटर क्षेत्रफळाचा 2 बीएचके फ्लॅट कार पार्किंगसह साधारण 2.59 कोटी रुपयांना विक्रीस काढला आहे. यासाठी लिलावात 7.74 लाख रुपये अनामत रक्कम भरणं आवश्यक आहे. लिलावात अपेक्षित किंमतीपेक्षा सर्वांत जास्त किंमत लावेल त्याला ती जागा मिळेल. याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर 137.50 चौरस फूट क्षेत्रफळाचा 3 बीएचके फ्लॅट साधारण 3.11 कोटी रुपये किमतीपासून पुढं लिलावात उपलब्ध आहे. त्याकरता 9.30 लाख रुपये अनामत ठेवणं आवश्यक आहे. एअर इंडियानं देशातील नवी दिल्ली, बेंगळूरू, मंगळूरू, भूज, थिरूवनंतपुरम या ठिकाणच्याही मालमत्ता विक्रीस काढल्या असून महाराष्ट्रातील मुंबईसह नागपूर, नाशिक, औरंगाबाद इथल्या मालमत्ताही लिलावात विक्रीस खुल्या केल्या आहेत. एमएसटीसी लिमिटेड (MSTC Ltd) या ऑनलाइन लिलाव संकेतस्थळातर्फे हा लिलाव होणार आहे. एअर इंडियाच्या संकेतस्थळावरही याबाबत माहिती देण्यात आली आहे. कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या एअर इंडियाचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू असून, कर्जफेडीसाठी आणि अन्य खर्चाच्या तरतुदीसाठी कंपनीनं मालमत्ता लिलावाचा पर्याय निवडला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Air india, India, Money

    पुढील बातम्या