8 मार्च, बेगुसराय : अलीकडच्या काळात नोकरी सोडून शेती करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. काही तरुण वेगळ्या पिकांचे, तसंच पीकपद्धतीचे प्रयोग करून भरघोस उत्पादन आणि उत्पन्न मिळवत आहेत. बिहारमधल्या अमन कुमार या तरुणाने अशाच प्रकारचा एक प्रयोग त्याच्या शेतात केला असून, त्यात त्याला चांगला नफा मिळत आहे. सर्वसामान्यपणे, स्ट्रॉबेरीची लागवड डोंगराळ भागात आणि थंड हवामान असलेल्या ठिकाणी केली जाते; मात्र आता बिहारमधल्या बेगुसराय जिल्ह्याच्या दियारा भागातल्या रामदीरी गावात स्ट्रॉबेरीची लागवड सुरू झाली आहे. गमतीची बाब म्हणजे स्ट्रॉबेरीची ही लागवड कोणत्याही सामान्य शेतकऱ्याने नाही, तर एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने सुरू केली आहे. अमन कुमार असं या सॉफ्टवेअर इंजिनीअरचं नाव आहे. अमन कुमारने सांगितलं, `लॉकडाउनमुळे कंपनीची स्थिती फारशी ठीक नसल्याने मी नोकरी सोडून गावी परतलो. फावल्या वेळात यू-ट्यूबवर स्ट्रॉबेरीची शेती करण्याच्या पद्धती अभ्यासल्या. त्यानंतर मी स्वतः स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेऊ लागलो. मी वडिलोपार्जित जमिनीवर स्ट्रॉबेरीची शेती सुरू केली आहे.` पुण्यावरून आणली रोपं… `मी सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. स्ट्रॉबेरीची लागवड करण्यापूर्वी मी राजस्थानमधल्या एका खासगी कंपनीत वार्षिक 30 लाख रुपयांच्या पॅकेजवर नोकरी करत होतो. कोरोनाच्या काळात लॉकडाउनमुळे कंपनीची स्थिती बिघडली आणि त्यामुळे मला नोकरी सोडून घरी परतावं लागलं. यानंतर मी बिहारमधल्या औरंगाबाद इथे स्ट्रॉबेरीची लागवड केलेल्या ब्रिजकिशोर प्रसाद सिंह यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर महाराष्ट्रात महाबळेश्वरमधून स्ट्रॉबेरीची रोपं घेतली. सध्या मी दोन एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली असून त्यातून मला महिन्याला तीन लाख रुपयांपर्यंत नफा मिळत आहे. याशिवाय मी स्ट्रॉबेरीची लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना मदत आणि प्रशिक्षणही देणार आहे,` असं अमन कुमारने सांगितलं. स्ट्रॉबेरी उत्पादनाविषयी टिप्स बेगुसराय जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातल्या फलोत्पादन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्ट्रॉबेरी लागवडीसाठी शेतकऱ्यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तीन ते चार वेळा रोटरने नांगरणी करावी. त्यानंतर शेतात शेणखत टाकल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो. तसंच शेतकरी रासायनिक खतांचा वापरही करू शकतात. हे सर्व केल्यानंतर शेतात बेड तयार करावेत. या बेडची रुंदी एक ते दोन फूट असावी. बेड एकमेकांपासून समान अंतरावर असावेत. रोपं लावण्यासाठी प्लास्टिक मल्चिंग करून त्यात ठरावीक अंतरावर छिद्रं पाडावीत. रोपं लावल्यानंतर ठिबक किंवा स्प्रिंकलरने पाणी द्यावं. तसंच कोणत्याही शेतकऱ्याला स्ट्रॉबेरी लागवडीसंदर्भात सविस्तर माहिती हवी असेल तर त्याने नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.