हरिष दिमोटे, प्रतिनिधी
शिर्डी, 02 डिसेंबर : शिर्डीच्या लोणीगावामध्ये गोळीबाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल रात्री झालेल्या या घटनेमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. राहाता तालुक्यातील लोणी गावातील ही घटना आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहे.
फरदीन अब्बू कुरेशी असं 18 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. मयत कुरेशी हा श्रीरामपूर शहरातील रहीवाशी आहे. त्याच्यावर काल रात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये गोळी लागून खोलवर झाल्यामुळे कुरेशीचा जागीच मृत्यू झाला आहे. मयताच्या नातेवाईकांनी फिर्याद दिल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात 7 जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. 1) संतोष सुरेश कांबळे 2) सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख 3)शाहरुख शहा गाठण सर्व राहणार श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर 4) उमेश नागरे 5) अरुण चौधरी 6)अक्षय बनसोडे 7) शुभम कदम अशी आरोपींची नावं असून सर्व लोणी तालुक्यामध्ये राहणारे रहिवाशी आहेत.
नेमका घडलेला प्रकार...
मयत कुरेशीला आरोपी संतोष सुरेश कांबळे, सिराफ उर्फ सोल्जर आयुब शेख, शाहरुख शहा गाठन यांनी नाशिक येथे सोबत येण्याबाबत जबरदस्ती करून धमकी दिली. त्याला जबरदस्ती घेऊन जाऊन त्यानंतर लोणी इथे आणून त्याच्यासोबत असलेले आरोपी उमेश नागरे, अरुण चौधरी, अक्षय बनसोडे, शुभम कदम यांनी मिळून काहीतरी वादाच्या कारणावरून बंदुकीची गोळी मारून अब्बू कुरेशीला गंभीर जखमी करून जीवे ठार केलं.
स्थानिकांनी या सगळ्या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळवण्यासाठी पोलीस घटनास्थळी चौकशी करत आहेत. तर परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.