• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'शेतकरी नवरा नको गं बाई!' ग्रामीण भागात 3 हजार तरुणांचे विवाह रखडले !

'शेतकरी नवरा नको गं बाई!' ग्रामीण भागात 3 हजार तरुणांचे विवाह रखडले !

अहमदनगर जिल्ह्यातल्या 45 गावांमधून हे सर्वेक्षण करण्यात आलं त्यात शेती व्यवसायाशी निगडित असल्याने तब्बल 3 हजार 68 तरुणांचे विवाह रखडल्याचं आढळून आलंय.

  • Share this:
मुंबई, 11 जुलै : सरकार एकिकडे शाश्वत शेतीच्या गप्पा मारत असतानाच तिकडे ग्रामीण भागात मात्र, शेती कसणाऱ्या लग्नाळू युवकांना कोणी पोरीच द्यायला तयार नाहीये. सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या सर्वेक्षणातून हे भयावह वास्तव समोर आलंय. अहमदनगर जिल्ह्यातल्या 45 गावांमधून हे सर्वेक्षण करण्यात आलं त्यात शेती व्यवसायाशी निगडित असल्याने तब्बल 3 हजार 68 तरुणांचे विवाह रखडल्याचं आढळून आलंय. आपल्या मुलीला नोकरीवालाच नवरा मिळवून द्यायच्या या मानसिकेतपोटीच बहुतांश पालक आपल्या मुली शेतकरी तरुणांना द्यायला तयार होत नसल्याचं या पाहणीतून पुढे आलंय. शिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे ग्रामीण भागातही मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढतंय. पण या शिकलेल्या मुलींचा लग्नासाठीचा कल मात्र, नोकरदाराकडे वाढताना दिसतोय. मुलगा एखाद्या कंपनीत शिपाई असला तरी चालेल पण तो नोकरीला असला पाहिजे. अशीच भूमिका आता ग्रामीण भागातल्या मुली बोलून दाखवताहेत. नापिकी, हमी भावाचा पत्ता नाही आणि कर्जबाजारीपणामुळे शेतीचा व्यवसाय अलिकडच्या काळात आतबट्ट्याचा व्यवहार होत चाललाय, त्यातून शेतकरी आत्महत्या वाढताहेत. कर्जमाफीची तात्पुरती मलमपट्टी या शेतीला फायद्यात आणू शकत नाहीये. म्हणूनच आजच्या पिढीच्या मुली 'शेतकरी नवरा नको गं बाई,' या मानसिकतेपर्यंत येऊन पोहोचल्यात. मुलींचे पालक लग्नावेळी नोकरदारालाच प्राधान्य देत असल्याने गावाकडचे तरूण विवाह जमेपर्यंत शहरांजवळच्या छोठ्यामोठ्या कंपन्यामधून नोकरी मिळवायची धडपड करताना या सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेत. पिंपळगाव देपा येथील ज्ञानेश्वर उंडे हे वर्षाकाठी १०० हून अधिक लग्ने जमवायचे पूर्वी त्यांच्याकडे मुलींचे बाप हेलपाटे मारायचे आता मात्र, चित्रं नेमकं उलटं आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्याकडे मुलांचे वडील चकरा मारत असल्याचंही या सर्वेक्षणात आढळून आले. सोलापूर, पुणे जिल्ह्यातील १० गावांमध्येही ३१९ तरुणांची लग्ने रखडल्याचे आढळून आले. विवाह रखडल्याने या तरुणांना नैराश्य येत असून ते व्यसनाधीन होत असल्याचेही दिसून येतंय. सर्वेक्षण झालेल्या 45 गावांमध्ये २५ ते ३० वयोगटातील २२९४ तर ३१ ते ४० वयोगटातील ७७४ तरुणांचे विवाह रखडले आहेत. एमबीए झालेल्या चार तरुणांचे तर केवळ शेती करीत असल्याने विवाह रखडल्याचं धक्कादायक वास्तव या पाहणीत आढळून आलंय. तिशी उलटलेल्या तरुणांनी तर विवाहाची आशाच सोडून दिली आहे. काही गावांमध्ये विवाह रखडलेले २५० ते ३०० तरुण आहेत. केवळ अल्प भूधारकच नाही, तर १० एकर जमीन असलेल्या कुटुंबांमध्येही विवाह रखडले आहेत.
First published: