Home /News /maharashtra /

विदर्भातील या शेतकऱ्याने करून दाखवलं! दुष्काळग्रस्त भागात तब्बल 32 एकरवर फळबाग

विदर्भातील या शेतकऱ्याने करून दाखवलं! दुष्काळग्रस्त भागात तब्बल 32 एकरवर फळबाग

विदर्भातील तरुण शेतकऱ्याने ऑटोमेशनचे तंत्रज्ञान वापरून तब्बल 32 एकर फळबाग साकारून आपलं जीवनमान बदललं आहे.

वाशिम, 26 डिसेंबर : विदर्भातील बहुतांश शेतकरी अद्यापही कोणते नवे तंत्रज्ञान न वापरता पारंपारिक पद्धतीनेच शेती करतात. मात्र वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील चांधई येथील सचिन ठाकरे या अवघ्या 10 वी उत्तीर्ण तरुण शेतकऱ्यांनं कमी पाणी असताना देखील केवळ ऑटोमेशनचे तंत्रज्ञान वापरून तब्बल 32 एकर फळबाग साकारून आपलं जीवनमान बदललं आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरीच फळबागा घेऊ शकतात हा समज सचिन ठाकरे यांनी 32 एकर जमिनीवर सफरचंद,स्ट्रॉबेरी आंबा,संत्रा,सीताफळ आणि पपईसह इतर जातींची फळं घेऊन खोटा ठरविला आहे. मंगरुळपिर तालुक्यातील चांधई येथील सचिन ठाकरे यांच्याकडे 32 एकर शेती आहे. पाणी अत्यल्प असल्यानं ते केवळ पारंपारिक पद्धतीने शेती करत असल्यानं त्यांना शेती कसणेही परवडत नसे. त्यामुळं त्यांनी आपल्या शेतीमध्ये पारंपारिक पिके न घेता फळबाग घेण्याचा निर्णय घेतला. प्रचलित पद्धतीने 32 एकरवरील फळबाग जगवायची असेल तर त्यासाठी मुबलक पाण्याची आवश्यकता होती. मात्र सचिन ठाकरे यांच्याकडे अत्यल्प पाणी असल्यानं त्यांनी केवळ 10 एकरवरच फळबाग केली होती. त्यामुळे उर्वरित 22 एकर जमीन खरीप पिकांनंतर पाण्या अभावी पडिक राहत होती. त्यावर सचिन ठाकरे यांनी उपाय शोधला आणि शेतीमध्ये उपलब्ध असलेल्या अत्यल्प पाण्यावरच ऑटोमेशन तंत्रज्ञान वापरून संपूर्ण 32 एकर जमीन ओलिताखाली आणून सर्वत्र फळबाग लावली. यामध्ये संत्रा 8 एकर,सफरचंद 3 एकर,किन्नो संत्रा 9 एकर,पेरू 5 एकर,सीताफळ 5 एकर,बारमाही आंबा 1 एकर,अर्धा एकर स्ट्रॉबेरीची बाग,आणि अर्धा एकर रोपवाटिका उभारली. या सर्व फळाबागेला ऑटोमेशनद्वारे पाणी,खतं दिलं जात असून मोठ्या प्रमाणात पाणी,खतं आणि पैशांची बचत झाली आहे. फळबागांसोबत आम्ही आंतरपीक ही घेतो. सद्यस्थितीत खरबूज आणि टरबुजाची लागवड करीत असून यातून ही मोठं आर्थिक उत्पन्न मिळणार आहे, असा विश्वास सचिन ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. सचिन ठाकरे या शेतकऱ्याला ऑटोमेशन तंत्रज्ञानामुळे 32 एकर वर फळबाग उभारता आली आहे. यांचं अनुकरण जर विदर्भातील शेतकऱ्यांनी केलं तर पारंपारिक शेतीला हा चांगला पर्याय ठरू शकतो. अत्यल्प पाण्यामुळे संपूर्ण 32 एकर शेती वर फळबाग घेणं शक्य नव्हतं. मात्र ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा उपयोग करून सचिन ठाकरे यांनी ते शक्य केलं आहे. या 32 एकर फळबागेमधून ते लाखोंचं उत्पन्न घेत आहेत. जर प्रत्येक शेतकऱ्यांनं आपल्या शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली तर त्यांचं जीवनमान बदलण्यास मोठी मदत होईल, हे सचिन ठाकरे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Farmer, Washim, WASHIM NEWS

पुढील बातम्या