पालघर, 27 जानेवारी : पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. आरोपी महिलेला तिच्या पतीचे अफेअर असल्याचा सुगावा लागला होता. त्यानंतर काही लोकांच्या मदतीने तिने पतीची हत्या केली. सध्या या प्रकरणी पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली 36 वर्षीय महिलेसह अन्य 4 जणांना अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत संतोष टोकरे याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध होते. हा प्रकार त्याच्या पत्नीला कळला. त्यानंतर संतापलेल्या पत्नीने पतीला मारण्याचा कट रचला. यानंतर चार साथीदारांसह संतोष टोकरे याची झोपेत असताना हत्या करण्यात आली. 20 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता वाडा तालुक्यातील कोंढाळे-बांदनपाडा गावात ही व्यक्ती त्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. वाचा - ‘‘मला अजून जगायचय….’’ असं लिहित महिलनं घेतला टोकाचा निर्णय, पण का? गळा दाबून खून सध्या याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृतदेहाच्या तपासात संतोषचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या डोक्यात अंतर्गत जखमाही आढळून आल्या आहेत. त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की, मृताचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. हा प्रकार पत्नीला कळला. यामुळे ती खूप संतापली होती. त्यानंतर तिने पतीला मारण्याचा कट रचला. त्यानंतर चार आरोपींच्या मदतीने तिने संतोषची हत्या केली. सध्या पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.