Explainer : BhimaKoregaon : दलित समाजासाठी भीमा कोरेगाव का आहे अस्मितेचं प्रतिक? असा 'विजय दिना'चा इतिहास

Explainer : BhimaKoregaon : दलित समाजासाठी भीमा कोरेगाव का आहे अस्मितेचं प्रतिक? असा 'विजय दिना'चा इतिहास

भीमा कोरेगाव हा दलित समाजासाठी अस्मितेचे प्रतिक आहे. यामागे कारण आहे ते एका ऐतिहासिक लढाईचे.

  • Share this:

पुणे, 31 डिसेंबर : भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018मध्ये झालेल्या हिंचाराला आता 2 वर्ष पूर्ण होत आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने दलित समाज याठिकाणी उपस्थित राहतो. भीमा कोरेगाव हा दलित समाजासाठी अस्मितेचे प्रतिक आहे. यामागे कारण आहे ते एका ऐतिहासिक लढाईचे. या ऐतिहासिक लढाईमुळे दलित समाजाकडून विजय दिन साजरा केला जातो.

भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंचारासाची पोलीस चौकशी अजूनही सुरू आहे. या तपासात पुणे पोलीस आता थेट अमेरिकेची तपास संस्था असलेल्या FBI (Federal Bureau of Investigation )ची मदत घेणार आहेत. त्यामुळे आता वरवरा राव यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या हार्ड डिस्कमधला डेटा मिळविण्यासाठी ही मदत घेण्यात येणार आहे. दरम्यान या हिंसाचाराला 2 वर्षे पूर्ण झाली असली तरी आजही या घटनेच्या जखमा आजही तेवढ्याच ताज्या आहेत.

भीमा कोरेगावची लढाई

भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818मध्ये झालेल्या लढाईत इंग्रजी फौजांचा विजय झाला आणि पेशव्यांचा पराजय. इंग्रजांच्या बाजूने लढणाऱ्या 500 महार सैनिकांनी प्रचंड शौर्य दाखवत पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला रोखून धरलं. या विजयाची आठवण म्हणून इंग्रजांनी तिथे विजयस्तंभ उभारला. महारांच्या तुकडीच्या शौर्याचं प्रतिक म्हणून तिथे विजय दिवस साजरा केला जातो. 1 जानेवारीच्या त्या लढाईच्या संदर्भांबाबत आजही इतिहासकारांमध्ये दुमत आहे. इतिहासकारांच्या मते, 1 जानेवारी 1818 रोजी मराठा साम्राज्य सांभाळणारे दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये हे युद्ध झालं. पुण्यातून राज्य चालवणाऱ्या पेशव्यांकडून ब्रिटिशांनी पुणं काबीज केलेलं होतं. पुणे म्हणजे पेशव्यांचा बालेकिल्ला होता. तो परत मिळवण्यासाठी दुसरे बाजीराव पेशवे यांनी प्रचंड मोठ्या फौज फाट्यासह इंग्रजांवर हल्ला केला. इंग्रजांच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फँट्री या सैनिकांच्या तुकडीत 500 महार सैनिक होते. या सैनिकांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला 12 तास रोखून धरलं. एक इंचही पुढे सरकू दिलं नाही. इंग्रजांची आणखी मोठी फौज येत असल्याची माहिती पेशव्यांना मिळाली त्यामुळं पेशव्यांनी आहे त्या परिस्थितीत युद्धातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आणि ब्रिटिशांचा विजय झाला, असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. या लढाईत इंग्रजांच्या 275 सैनिकांचा मृत्यू झाला तर पेशव्यांचे 600च्या आसपास सैनिक मृत्युमुखी पडले. ही लढाई जिंकण्याचा दिवस म्हणजे 1 जानेवारी 1818 ची पहाट होती. या लढाईत महार सैनिकांनी जे शौर्य दाखवलं त्यामुळेच विजय मिळाला. भीमा-कोरेगावमध्ये विजय स्तंभ उभारला गेला आणि त्यावर युद्धात धारातिर्थी पडलेल्या सैनिकांची नावे कोरली आहेत.

बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला विजय दिन

1 जानेवारी 1927मध्ये बाबासाहेब आंबेडकारांनी सर्वातआधी विजय दिन सोहळा साजरा केला. त्यावेळी मोठ्या संख्येने दलित समाज उपस्थित होता. त्यानंतर 1945मध्ये भारतीय सैन्यदलात आंबेडकरांमुळे महार रेजिमेंटची स्थापना करण्यात आली. त्यामुळं दरवर्षी महार रेजिमेंट आणि दलित समाज मोठ्या संख्येने उपस्थित असतो.

2018मध्ये नक्की काय झालं होत

पुण्यापासून सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दलित नेत्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता, ज्याला काही संघटनांनी काही कारणांनी विरोध दर्शविला. त्यानंतर याठिकाणी हिंसाचार भडकला. या घटनांची सुरुवात पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर येथून झाली. या गावांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. राज्यभरात दुसऱ्या दिवशी याचे पडसाद उमटले. तर, प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आणि घटनेनंतर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. मात्र दोन वर्षांपूर्वी भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंचारानंतर पोलिसांनी भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुणे पोलिसांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चार तालुक्यांमध्ये कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आली आहे.

का आहे दलित अस्मितेचे प्रतिक?

पेशाव्यांच्या राजवटीत त्या काळात दलितांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जात असे. दलितांना त्यांचे मुलभूत अधिकारही नाकारले जात होते. त्याची प्रचंड सल दलितांच्या मनात होती. त्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी महार सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आणि ते लढले आणि पेशव्यांचा पराभव केला. याचीही किनार या विजयाला असल्याने दलित समाजाचा या विजयाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन आहे. या विजयामुळे दरवर्षी 1 जानेवारीला नवीन वर्षाचे स्वागत देशभर होत असताना दलित समुदायाचे लोक भीमा-कोरेगावमध्ये जमतात. ते इथल्या 'विजय स्तंभासमोर' नतमस्तक होतात. कारण या लढ्यामुळे दलित समाजाच्या इतिहासात विशेष स्थान प्राप्त झाले.

Published by: Priyanka Gawde
First published: December 31, 2019, 8:23 PM IST
Tags: Explainer

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading