मुंबई, 22 ऑक्टोबर : राज्यातील काही भागात अद्यापही परतीच्या पावसाने धुमाकूळ घातले आहे. मागच्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने सर्वात जास्त नुकसान शेती पिकाचे झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटामुळे गेल्याने ऐन दिवाळीत शेतकरी हवालदिल झाला आहे, दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज (ता. 22) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज कायम आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याची तिव्रता वाढत असल्याने राज्यात पुन्हा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. अंदमानमधील कमी दाबाच्या क्षेत्रापासून तमिळनाडू, केरळ ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वरील प्रणालीत मिसळून गेले आहेत. पंजाब आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. यामुळे देशभरात पुढचे दोन दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : भारतच नाही तर या देशांमध्येही निसर्गाचा तांडव! फोटो पाहून उडेल झोप
राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार केला आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे. कोकण आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागच्या 24 तासांत पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे सर्वाधिक 110 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज (ता.22) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
कमी दाब क्षेत्र होतेय अधिक तीव्र
बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उद्यापर्यंत (ता. 22) ही प्रणाली आणखी तीव्र होईल. सोमवारपर्यंत (ता. 24) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या निर्मितीचे संकेत आहेत. ही प्रणाली उत्तरेकडे वळून पश्चिम बंगाल, बांगलादेशाच्या किनाऱ्याकडे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हे ही वाचा : Career Tips: पाऊस, ऊन आणि वादळ सर्वात आधी तुम्हाला मिळेल अलर्ट; असे व्हा हवामान शास्त्रज्ञ
परतीचा पाऊस लांबण्याची शक्यता
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत मुंबई-पुण्यासह संपूर्ण राज्यासह देशातून मोसमी वारे माघारी जातील, अशी स्थिती सध्या निर्माण झाली. मात्र, त्याचवेळी दोन दिवसांच्या कालावधीत केवळ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत हलक्या सरींची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात दोन दिवसात कोरडं हवामान राहील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. अरबी समुद्रातील बाष्पामुळे मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सात ते आठ दिवसांनी लांबला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Heavy rain, Rain fall, Weather forecast, Weather update, Weather warnings