बीड, 15 ऑगस्ट : शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांचं काल पहाटे पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर अपघाती निधन झालं. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूवर त्यांची पत्नी डॉक्टर ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी संशय व्यक्त केला आहे. मेडिकल टर्मोनॉलॉजीनुसार मृत्यूनंतर एवढ्या लगेच चेहरा पांढरा पडत नाही, काही काळानंतर चेहरा पांढरा पडायला सुरूवात होते, पण साहेबांचा चेहर अतोनात पांढरा पडला होता, असं ज्योती मेटे म्हणाल्या. ‘अपघाताबाबतची माहिती मिळाल्यानंतर मी धावत सुटले. मदतीसाठी मी विश्वास नांगरे पाटील यांना फोन केला. माझा भाऊ पोलिसात उच्चपदावरचा अधिकारी आहे, मी त्यालाही फोन करण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनीही फोन उचलला नाही,’ अशी प्रतिक्रिया विनायक मेटेंच्या पत्नीने दिली. ‘मी ड्रायव्हरला फोन करत होते, पण तो मला अपघात कुठे झाला याचं नेमकं लोकेशन सांगत नव्हता. मी त्याला व्हॉट्सऍपवर लोकेशन पाठवयाला सांगितलं, पण त्याने तेही केलं नाही. अखेर मी वाहतुक पोलिसांना फोन केला, त्यांनी साहेबांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये नेल्याचं सांगितलं,’ असं वक्तव्य ज्योती मेटे यांनी केलं. ‘वाहतुक पोलिसांनी सांगितल्यानंतर मी एमजीएम हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिकडे गेल्यावर मला साहेबांचा चेहरा जास्तच पांढरा दिसला. मेडिकल टर्मोनॉलॉजीनुसार चेहरा इतक्या लगेच पांढरा पडत नाही. त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्त येत होतं. मी त्यांच्या नाडीचे ठोके तपासले पण हाती काही लागलं नाही. इसीजीमध्येही कोणतीच हालचाल नव्हती. तिथल्या डॉक्टरांनी मला बाहेर जायला सांगितलं, पण मी स्वत: डॉक्टर आहे आणि विनायक मेटेंची पत्नी आहे, असं त्यांना सांगितलं,’ असा घटनाक्रम ज्योती मेटे यांनी सांगितला आहे. ‘अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मी पाऊण तासाने हॉस्पिटलला पोहोचले, पण अपघात होऊन पाऊण तास झाला नव्हता. अपघाताला कमीत कमी दोन तास तरी झाले होते. आमच्यापासून काही लपवलं जातंय का? कदाचित ते लपवतही नसतील, मीच घाबरले असेन. पण अपघात झाल्यानंतर मला बऱ्याच वेळाने फोन आला. पोस्टमॉर्टममधून सगळ्या गोष्टी समोर येतील, अपघाताची वेळही त्यातूनच कळेल,’ अशी प्रतिक्रिया मेटेंच्या पत्नीने दिली. मराठा संघटनांचाही संशय दरम्यान विनायक मेटे यांची आई आणि मराठा आंदोलनाच्या नेत्यांनी मेटे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. रविवारी दुपारी 4 वाजता बैठक ठरली होती, पण मेटेंना मंत्रायलायतून बैठक 12 वाजता होणार असल्याचं सांगण्यात आलं. बैठकीची वेळ का बदलण्यात आली? मंत्रालयातून नेमका फोन कोणी केला? असा संशय मराठा आंदोलनाचे नेते दिलीप पाटील यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे शिवसेनेनंही मेटेंच्या अपघाती मृत्यूबाबत शंका उपस्थित केली आहे. शिंदे आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले होते, तेव्हा मेटे यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मेटे यांना कोणी फोन करून बोलावले, याची चौकशी व्हावी अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.