नागपूर 24 ऑक्टोंबर : भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या विदर्भावर पक्षाची मोठी भिस्त होती. मात्र दुपारी 12 वाजेपर्यंत असलेल्या कलांमध्ये भाजप सर्वात वरच्या क्रमांकावर असला तरी 2014 च्या वेळी असलेली निर्णायक बढत दिसत नाही. विदर्भातल्या एकूण 62 जागांपैकी भाजपला 2014 मध्ये तब्बल 44 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते. तरीही भाजपने 44 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेला फक्त 4 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. यावेळी भाजप दुपारपर्यंत विदर्भात 33 जागांवर आघाडीवर होता. असेच ट्रेंड्स राहिले तर भाजपला 2014ची स्थिती गाठणं कठीण जाणार आहे. विदर्भातून यवतमाळमधून मदन येरावार तर अमरावतीमधून कृषीमंत्री अनिल बोंडे पिछाडीवर आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरातल्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूरमधून निर्णायक आघाडी घेतलीय. 2019 च्या निवडणुकीत भाजपने विदर्भातून 50 जागांचं टार्गेट ठेवलं होतं. सध्याची स्थिती पाहाता या टार्गेटपर्यंत भाजप पोहोचू शकणार नाही अशी स्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर 145 तर युतीम्हणून 230 ते 240 चा टप्पा ओलांडण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली होती. ते टार्गेट भाजप पूर्ण करू शकणार नाही अशी शक्यता आता व्यक्त केली जातेय. विदर्भ - 2014 परिस्थिती एकूण जागा - 62 भाजप - 44 शिवसेना - 4 काँग्रेस - 10 राष्ट्रवादी - 1 इतर - 3 2014 ची विधानसभेची परिस्थिती मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. एकूण जागा - 288 भाजप - 122 शिवसेना - 63 काँग्रेस - 42 राष्ट्रवादी - 41 गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. या वेळी हा फॅक्टर फडणवीस सरकारसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे कळेल. राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावल्यानंतर भाजप-सेना युतीचं सरकार आलं होतं. गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं. या वर्षी निवडणुकीपूर्वीच युती आणि आघाडी झाल्याने कुठल्याच पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढवल्या नाहीत. सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आश्चर्यकारकरीत्या बहुजन समाज पार्टी हा राहिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







