मुंबई, 10 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी दुपारी 3 वाजता मुंबईत दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन करणार आहेत. जर तुम्ही मुंबई ते सोलापूर किंवा मुंबई ते साईनगर शिर्डी प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर आजपासून कार्यान्वित होणार्या दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. असा असणार रुट - मुंबई आणि सोलापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सोलापूरमधील सिद्धेश्वर आणि जवळील अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. मुंबई ते सोलापूर 6.35 तासांत पोहोचता येईल. मुंबई ते सोलापूर दरम्यान, ही वंदे भारत ट्रेन दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबा घेणार आहे. मुंबई-शिर्डी मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसने नाशिक, त्र्यंबकेश्वर, शनि सिंगणापूर आणि साईनगर शिर्डी सारखी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत. मुंबई ते शिर्डी हे अंतर वंदे भारत एक्सप्रेस 5.24 तासांत पार करता येणार आहे. ही गाडी दादर, ठाणे आणि नाशिकरोड या तीन स्थानकांवर थांबेल. बुकींग - या गाड्या आठवड्यातून सहा दिवस धावतील. आरक्षण बुकिंग 10 फेब्रुवारी रोजी PRS काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल. या वंदे भारतच्या ट्रेनच्या वेळा जाणून घेण्यासाठी, तुम्ही NTES अॅपवर चेक करू शकता किंवा www.enquiry.indiarail.gov.in साइटला भेट देऊ शकता. वंदे भारत ट्रेनची वैशिष्ट्ये - - सोलापूर पासून पुढे दौंड जंक्शन पर्यंत रेल्वे ट्रॅक डबलिनची कामे झाली आहेत . - वंदे भारत एक्स्प्रेस किंवा ट्रेन ही भारतातील पहिली इंजिन नसलेली ट्रेन आहे. बुलेट किंवा मेट्रो ट्रेनसारखे इंटिग्रेटेड इंजिन आहेत. - पूर्णपणे स्वयंचलित दरवाजे आणि एसी कोच ट्रेनमध्ये 16 पूर्णपणे वातानुकूलित चेअर कार कोच आहेत ज्यात दोन आसन पर्याय आहेत. इकॉनॉमी आणि एक्झिक्युटिव्ह क्लास. आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये रिव्हॉल्व्हिंग चेअर देण्यात आली आहे .जी 180 अंशांपर्यंत चालू शकते. - ट्रेनमध्ये जेवणाची सुविधा सेमी-हाय स्पीड ट्रेनमधील खाद्यपदार्थ फक्त तिकिटाच्या किंमतीत समाविष्ट केले जातात. परंतु यात जेवणाची व्यवस्था असु शकते . - ट्रेनमध्ये GPS आधारित प्रगत प्रवासी माहिती प्रणाली देखील आहे. जी तुम्हाला आगामी स्थानके आणि माहितीबद्दल अपडेट करेल. -ट्रेनमधील स्वच्छतेचा प्रश्न सोडवण्यासाठी बायो-व्हॅक्युम टॉयलेट बनवण्यात आले आहेत. हे भारतीय आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारच्या वॉशरूमसाठी वापरले जाऊ शकते. विमानात वापरल्या जाणार्या विमानांप्रमाणेच आहेत . -प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ट्रेनच्या सर्व 16 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ट्रेन पूर्ण थांबल्यावरच ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे उघडतील. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या काही डब्यांमध्ये व्हीलचेअर ठेवण्यासाठी जागा असेल, असं विभागीय व्यवस्थापक सोलापूर निरजकुमार डोहारे यांनी सांगितले.
असे असेल वेळापत्रक - मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन - ट्रेन क्र. 22225 सीएसएमटी स्थानकातून 16.05 वाजता सुटेल आणि 22.40 वाजता सोलापूरला पोहोचेल. बुधवारी ही ट्रेन बंद असेल. - ट्रेन क्र. 22226 सोलापूर ते मुंबई मार्गावर धावणार आहे. सोलापूरहून सकाळी 6.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12.35 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. गुरुवारी ही ट्रेन उपलब्ध नसेल. हेही वाचा - मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन - - ट्रेन क्र. 22223 सकाळी 6.20 वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.40 वाजता शिर्डी येथे पोहोचेल. मंगळवारी ही ट्रेन बंद असेल. - ट्रेन क्र. 22224 शिर्डी येथून 17.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 22.50 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. मंगळवारी ही ट्रेन बंद असेल. तिकिटाचे दर - वंदे भारत ट्रेनमधून मुंबईतून पुण्यापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चेअर कार अर्थात सीसीसाठी 560 रुपये, तर एक्झिक्युटिव्ह चेअर अर्थात ईसीसाठी 1135 रुपये भाडं आकारण्यात येणार आहे. नाशिकसाठी सीसीचं भाडं 550 रुपये, तर ईसीसाठी 1150 रुपये असेल असा अंदाज व्यक्त होत आहे. साईनगर शिर्डीसाठी सीसीकरिता 800 रुपये, तर ईसीसाठी 1630 रुपये भाडं असू शकतं. सोलापूरसाठी सीसी आणि ईसीसाठी तिकिटाचे दर क्रमशः 965 आणि 1970 रुपये असतील. महाराष्ट्रात किती वंदे भारत एक्सप्रेस - महाराष्ट्रात याआधी दोन वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. यातील एक ट्रेन मुंबई ते अहमदाबाद आणि दुसरी नागपूर ते बिलासपूर अशी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वंदे भारत गाड्यांची संख्या चारवर पोहोचणार आहे. मात्र, देशातील अनेक राज्यांमध्ये एकही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावली नाही. यामध्ये बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, केरळ, ईशान्य आणि ओडिशा यांचा समावेश आहे. पंजाब आणि हरियाणालाही वंदे भारत ट्रेनची भेट मिळालेली नाही. दिल्लीहून कटरा आणि हिमाचलला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस या राज्यातून जाते.