इंदापूर, 17 मार्च : कबड्डी या खेळामध्ये महाराष्ट्रासह देशामध्ये नावलौकिक वाढवणाऱ्या कळंब (ता. इंदापूर )येथील महाराणा कबड्डी संघातील दोन खेळाडूंचा अपघाती मृत्यू (Indapur Accident) झाला आहे. कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बेडगी येथे राज्यस्तरीय कबड्डी सामन्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली आहे.
इंदापूर तालुक्यातील कबड्डी खेळाडू सामन्यात सहभाग घेतल्याने सामने खेळण्यासाठी तवेरा या चारचाकी गाडीमध्ये बसून खेळावयास जात होते. मात्र बुधवारी (दि. 17 रोजी) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास रनिहला क्रॉस जवळ ( तालुका कोल्हारा )समोरून आलेल्या कंटेनरची व तवेराची समोरासमोर धडक झाल्याने दोन कबड्डीपट्टूंचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी आहेत.
इंदापूर तालुक्यातील कळंब येथील महाराणा क्रीडा संस्थेच्या कबड्डी संघाने तालुका, जिल्हा नव्हे तर राज्य व देश पातळीवर नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या संघात कबड्डी खेळामध्ये प्राविण्य मिळवून 20 हून अधिक खेळाडू पोलीस पदावर कार्यरत आहेत. पुणे, सोलापूर सांगली ,सातारा, कोल्हापूर, मुंबई, यासह कर्नाटक येथे कबड्डीच्या विविध स्पर्धांमध्ये कळंब येथील महाराणा कबड्डी संघ कायम यश खेचून आणत असतो.
बुधवारी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी कळंब येथील महाराणा कबड्डी संघातील राष्ट्रीय खेळाडू महादेव आवटे, सोहेल सय्यद, समीर शेख, अनिकेत सूर्यवंशी, संदीप सूर्यवंशी, गणेश कोळी, अविष्कार कोळी, सिद्धार्थ कांबळे यासह 13 जण तवेरा गाडीमधून विजापूरकडे रवाना झाले. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी व कंटेनरची धडक झाल्याने गाडीमधील समोर बसलेले महादेव आवटे (वय 20 वर्ष) व सोहेल सय्यद (वय 22 वर्ष )या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर वाहन चालक वैभव मोहिते व गणेश कोळी यांना गंभीर दुखापत झाली आहे.
सर्व जखमींना विजापूर येथील बंजारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कबड्डी या खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक वाढवणाऱ्या खेळाडूंचा अपघाती दुर्दैवी अंत झाल्याने कळंब गावावर अक्षरशा: दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळंब गावातील व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी गाव बंद ठेवून दुखवटा व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.