पुणे, 19 एप्रिल : पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढलेला मृत्यूदर प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून हा मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला काहीसं यश आलं होतं. मात्र ससून रुग्णालयात होणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण आणखी कमी करण्यासाठी आता नव्याने प्लॅन आखण्यात आला असून त्रिसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आजाराचं लवकरात लवकर निदान, स्पष्ट लक्षणे नसणारे रुग्णांची काळजी आणि अतिदक्षता विभागातील रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे या त्रिसूत्रीच्या आधारे कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. ‘ससून रुग्णालयातील अतितक्षता विभागात रुग्णसेवेचा दर्जा आता आणखी उंचावण्यात आला आहे. तसंच अत्यवस्थ रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्यावर लवकरात लवकर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याआधारे आगामी काळात आपण हा मृत्यूदर कमी करू शकतो,’ असा विश्वास कोरोनाविरोधातील लढाईतील सरकारचे प्रमुख तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त दिलं आहे. ससूनमध्येच कोरोनाबाधितांचा मृत्यूदर जास्त का? कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळले होते. नंतरच्या काळात ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आलं. मात्र गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा संख्या वाढू लागली आहे. या सगळ्यात ससूनमध्ये कोरोनाग्रस्तांचा जास्त असलेला मृत्यूदर चिंताजनक आहे. ससूनमध्ये जास्तीत जास्त अत्यवस्थ रुग्णच दाखल होतात, त्यामुळे हा मृत्यूदर जास्त असल्याचं सांगितलं जातं. पुण्यातील मृत्यूदरात घट, पालिका आयुक्तांची माहिती गेल्या तीन दिवसात पुण्यातल्या बाधित रूग्णसंख्या आणि मृत्यूच्या गुणोत्तरात घट झाली आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाण कमी करून रूग्ण बरे करण्यात वाढ होत असल्याची महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे. पुढच्या दहा दिवसांत आंतरराष्ट्रीय मृत्यू दरापर्यंत पुण्यातली आकडेवारी खाली येण्याचा विश्वासही शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.