पिंपरी चिंचवड, 10 जानेवारी : पिंपरी चिंचवडमध्ये एका 3 वर्षीय चिमुकल्याचा आणि त्याच्या आईचा निर्घृणपणे खून केल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात घडलेल्या या घटनेत 40 वर्षीय सुमय्या शेख आणि तिचा तीन वर्षीय मुलगा आयान यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील एका बंद खोलीतून उग्र कुबट वास येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी खोलीत माय लेकाचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले. मृतदेहाच्या शेजारी रक्ताने माखलेला चाकू सापडला आहे. घराबाहेर बियरच्या बाटल्या, बिस्कीटचे पुडे, चॉकलेट आढळून आले. पोलिसांनी घरमालकाकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी 15 डिसेंबर रोजी रिक्षाचालक असलेल्या दोन तरुणांना त्याने ही खोली भाड्याने दिल्याचे सांगितले. मात्र, बुधवार पासून दोन्ही तरुण फरार झाल्याने त्यांच्यावर संशय बळावला आहे. ही मायलेक नेमकी कोठून आली आहेत. तसेच, या ठिकाणी कधीपासून राहत आहेत, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.