जात अन् धर्माच्या भिंती कोसळल्या...मराठा आरक्षणासाठी अख्खं गाव रस्त्यावर, राज्याचं लक्ष वेधलं

जात अन् धर्माच्या भिंती कोसळल्या...मराठा आरक्षणासाठी अख्खं गाव रस्त्यावर, राज्याचं लक्ष वेधलं

केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येत मराठा समाजाला आरक्षण मिळवूनच द्यावं, यासाठी गावात राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.

  • Share this:

जालना, 20 जानेवारी : 'राव न करी तो गाव करी', या म्हणीचा प्रत्यय जालन्यात पाहायला मिळाला. जात, धर्म, राजकीय पक्ष हे सर्व भेदभाव बाजूला सारून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंबड तालुक्यातील संपूर्ण साष्टपिंपळगाव रस्त्यावर उतरलं आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सुरू होणाऱ्या अंतिम सुनावणी संदर्भात तारीख पे तारीख सुरू असताना दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येत मराठा समाजाला आरक्षण मिळवूनच द्यावं, यासाठी गावात राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.

भगवे झेंडे...सजवलेल्या 20 बैलगाड्या...25 ट्रॅक्टर...50 मोटारसायकली...हलगी आणि ताश्याच्या तालावर थिरकणारी मंडळी...लेझीम पथक...बँड पथक...महिला...मुली...तरुणांसह गावातील सर्व अबालवृद्ध हे चित्र गावातल्या यात्रेचं नसून हे आहे मराठा आरक्षणासाठीचा आगळा वेगळा आंदोलन. एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण, आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, या घोषणा देत गावकऱ्यांनी आसमंत दणाणून सोडला होता. राजकारण बाजूला ठेवून केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येत मराठा समाजाला आरक्षण मिळवूनच द्यावं, यासाठी गावात आज राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यापूर्वी गावातून विशाल महारॅली काढण्यात आली.

विशाल मिरवणुकीअंतर ठिय्या आंदोलनात झालं. याठिकाणी 9 शिवकन्यांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना करण्यात आली. या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनासाठी राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक हजर झाले आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत 25 तारखेपासून अनेक कार्यकर्ते याठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत

दरम्यान, राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांबरोबरच राजमाता जिजाऊ यांच्या माहेरचे वंशज श्रीमंत शिवाजीराजे जाधव यांनीही या ठिय्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शविला. साष्टपिंपळगावाने मराठा आरक्षणासंदर्भात राज्यसमोर आदर्श निर्माण केला असून सर्वांनी आरक्षण मिळेपर्यंत त्यांच्या सोबत कायम राहून राज्यभर लढा उभारवा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 20, 2021, 11:25 PM IST

ताज्या बातम्या