ठाणे, 7 जुलै : आयसीसी स्पर्धेतील टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा आज (7 जुलै) वाढदिवस आहे. रांचीच्या या युवराजनं भारतीय क्रिकेटमध्ये स्वत:चं साम्राज्य उभारलंय. धोनी रिटायर होऊन आता जवळपास तीन वर्ष झालीत. त्यानंतरही क्रिकेट फॅन्सवर त्याचं गारुड कायम आहे. धोनीचा वाढदिवस म्हणजे या फॅन्सला आपलं त्याच्यावरील प्रेम व्यक्त करण्याची संधी असते. ठाण्यातील एका तरुणीनं धोनीला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. कशा दिल्या शुभेच्छा? ठाण्यातील पाचपाखडी परिसरात राहणाऱ्या प्रांजली चव्हाण या तरुणीने झूम आर्ट या डिजिटल आर्टच्या माध्यमातून धोनीला शुभेच्छा दिल्यात. एका कंपनीत काम करणारी प्रांजली ही धोनीची जबरा फॅन आहे. गेल्या 9 वर्षांपासून ती धोनीला हटके पद्धतीनं शुभेच्छा देते. यंदा तिनं झूम आर्टच्या माध्यमातून माहीला शुभेच्छा दिल्यात.
धोनीच्या लहाणपणापासून ते यावर्षीच्या आयपीएल विजेतेपदापर्यंतचा सर्व प्रवास यामध्ये दाखवण्यात आलाय. प्रांजलीनं दिलेल्या या हटके शुभेच्छा आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यात. धोनीचे फॅन्स याबद्दल तिचं कौतुक करत आहेत. ‘मी महेंद्रसिंह धोनीची पहिल्यापासूनच फॅन आहे. मी कला क्षेत्रातील कोणतंही शिक्षण घेतलेलं नाही. पण, त्यामध्ये आवड असल्यानं हे डिजिटल झूम आर्ट तयार केलंय. आपल्या देशात खूप कमी कलाकार या पद्धतीनं आर्ट तयार करतात. यामध्ये सहसा कार्टून, जपानी आर्ट तयार केली जातात. Happy Birthday MS Dhoni : ‘कॅप्टन कूल’ चं बाईक कलेक्शन पाहिलंत का? मी दरवर्षी धोनीला वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून शुभेच्छा देत असते. मी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि आषाढी एकादशीनिमित्त झूम आर्ट तयार केलं होतं. त्याला नेटकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर धोनीलाही याच पद्धतीनं शुभेच्छा देण्याचं ठरवलं. मी आजवर धोनीला कधीही भेटलेली नाही, पण त्याला भेटण्याची तीव्र इच्छा आहे. मी यंदा तयार केलेलं हे आर्ट धोनीपर्यंत पोहचलं तर मला खूप आनंद होईल, अशी भावना प्रांजलीनं व्यक्त केली.