डोंबिवली, 22 जुलै : गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे झालेल्या पडझडीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले तर अनेकांना आपल्या आप्तांना गमवावे लागले. रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी या आदिवासी पाड्यावर दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. असा प्रसंग डोंबिवलीत घडू नये यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेला जाग आली असून जवळच असलेल्या नेतीवली टेकडीवरील 15 कुटुंबाचे स्थलांतर केले आहे. कायमस्वरूपी मार्ग काढावा दरवर्षी कोणत्यातरी ठिकाणी दरड कोसळते. यामध्ये वाडीच्या वाडी उध्वस्त होते आणि दरवर्षी प्रशासन मार्ग काढेल असे आश्वासन मिळते. मात्र तोपर्यंत पावसाळा येतो आणि आणखी एक वाडी पुन्हा उध्वस्त होते. यापैकीच तळीये, दासगव, माळीण आणि आता इर्शाळवाडी. मात्र इर्शाळवाडीची घटना घडल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेने नेतीवली टेकडीवर राहणाऱ्या 15 कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. पण कायमस्वरूपी मार्ग काढावा अशी मागणी नेतीवली टेकडीवरील हनुमान नगर वस्तीतील नागरिकांनी केली आहे.
दरवर्षीच या टेकडीवर अशा विविध घटना घडत असतात. अनेक नागरिक जखमी देखील झाले असून येथील घरांची संख्या वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक वेळा महापालिकेने नोटिसा दिल्या असल्याची माहिती महापालिका सहाय्यक आयुक्त सविता हीले यांनी दिली.
मोठी बातमी! यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात 45 जण अडकले, युद्धपातळीवर बचाव कार्य
मात्र आता त्यातील काही कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असून याच परिसरात असलेल्या महापालिकेच्या संक्रमण शिबिरात त्यांची सोय करण्यात आली आहे. 140 कुटुंबांना स्थलांतरित व्हा अशा नोटिसा देखील पाठवल्याचे सविता हीले यांनी सांगितले.