डोंबिवली, 29 जुलै : लहानपणी आपण सर्वच दोरी उड्या मारतो. आपल्याकडं टाईमपास म्हणून खेळल्या जाणाऱ्या या प्रकारात गांभीर्यानं लक्ष दिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील यश मिळवता येतं, हे महाराष्ट्रीय खेळाडूंनी सिद्ध केलंय.अमेरिकेतल्या कोलोरॅडोमध्ये झालेल्या जागतिक जम्प रोप चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय टीमनं जोरदार कामगिरी केलीय. या टीममध्ये डोंबिवलीच्या 9 तर नाशिकच्या 4 खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंनी या स्पर्धेसाठी खास पद्धतीनं सराव केला होता. न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी याबाबतचं रहस्य सांगितलंय. रात्री केला सराव डोंबिवलीच्या खेळाडूंनी या स्पर्धेसाठी कठोर मेहनत घेतली होती. ते सुरुवातीला दिवसा सराव करत. त्यानंतर अमेरिकेत ही स्पर्धा होणार असल्याचं लक्षात घेऊन त्यांनी सराव सुरु केला. या खेळाडूंनी अमेरिकेच्या वेळेला मॅच करण्यासाठी आपल्याकडील रात्री या खेळाचा सराव केला, अशी माहिती त्यांचे प्रशिक्षक अमन वर्मा यांनी दिली.
या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व खेळाडू 12 ते 16 या वयोगटातले आहेत. भारतीय खेळाडूंनी एकूण 9 गोल्ड, 3 सिल्व्हर आणि 7 ब्रॉंझ मेडल जिंकले. एकूण 25 देशांमधील 1200 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या सर्वांमध्ये डोंबिवलीकर खेळाडूंनी आपला ठसा उमटवला, असे त्यांनी सांगितले. सरकारी मदत नाही या खेळाला अजून ऑलिम्पिकचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे सरकार या खेळाला पैसे देत नाही. पालकांनी स्वतःच्या खर्चाने सरावासाठी मोठा हॉल घेतला. या खेळाच्या सरावासाठी मोठी जागा लागत असल्याने आम्हाला ते करावे लागले अशी माहिती या खेळाडूंचे पालक सरिता महाजन आणि महेश मुंगी यांनी दिली. सरकारनं खेळाला मदत केली तर खेळाडूंचे मनोबल आणखी वाढेल, असं त्यांनी सांगितलं. ठाण्यात आहे बाहुबली फेम धबधबा? तुम्ही कधी गेलाय का इथं? पदकविजेते खेळाडू 1) नमन गंगवाल, 2 गोल्ड, सिल्व्हर (नाशिक) 2) नियती छोरिया, 2 गोल्ड, सिल्व्हर (नाशिक) 3) ईशान पुथरन, 2 गोल्ड, 2 ब्रॉंझ (चंद्रकांत पाटकर विद्यालय,डोंबिवली) 4) भूमिका नेमाडे, 2 गोल्ड, ब्रॉंझ (चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली) 5) राजुल लुंकड, गोल्ड (नाशिक) 6) मानस मुंगी, सिल्व्हर, ब्रॉंझ (चंद्रकांत पाटकर विद्यालय,डोंबिवली) 7) अंकिता महाजन, ब्रॉंझ (सिस्टर निवेदिता हायस्कुल,डोंबिवली), 8) तन्वी नेमाडे, ब्रॉंझ (रॉयल इंटरनॅशनल सीबीएससी स्कुल,डोंबिवली) 9) योगिता सामंत, ब्रॉंझ (चंद्रकांत पाटकर विद्यालय,डोंबिवली)