भाग्यश्री प्रधान आचार्य डोंबिवली , 16 मे 2023 : लहानपणापासून आई वडिलांनी आपल्या मुलांबद्दल स्वप्न पाहिलेली असतात. ही स्वप्न पूर्ण होण्याची पहिली पायरी म्हणजे दहावीची परीक्षा. शालेय आयुष्यातील शेवटची परीक्षा असलेल्या या परीक्षेला देशभरात मोठं महत्त्व आहे. याच परीक्षेनंतर महाविद्यालयीन आयुष्याला सुरूवात होते. सीबीएसई बोर्डांतर्गत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये ठाणे शहरात यश भासेन देशात पहिला आलाय. ठाण्यातील श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेचया विद्यार्थी असलेल्या यशनं तब्बल 99.8 टक्के मार्क्स मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावलाय. देशभरातून 2 लाख 37 हजार 631 विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली. त्यामध्ये 9 जण समान मार्क मिळवत पहिले आले. या यादीत यशचा समावेश आहे.
काय आहे फॉर्म्युला? देशात पहिला क्रमांक पटकावण्यासाठी कसा अभ्यास केला याचं रहस्य यशनं यावेळी सांगितलं. ‘मी पाठांतर करण्यापेक्षा संकल्पना स्पष्ट करून अभ्यास केला. शाळेत शिक्षक जे शिकवत तोच अभ्यास मी घरी आल्यानंतर पुन्हा करत असे. मी एक-एक तासाचा स्लॉट केला होता. त्यानुसार अभ्यास केल्यानं कोणत्याही विषयाचा कंटाळा आला नाही. शेवटच्या दोन महिन्यात मी पूर्ण अभ्यासावर फोकस केला होता. माझ्या या यशात शाळेतील शिक्षकाचाही मोठा वाटा आहे,’ असं यशनं सांगितलं. BSE, ICSE तर लागला; कधी जाहीर होणार महाराष्ट्र बोर्डाचा निकाल? यशच्या या कामगिरीत त्याच्या आई हर्षा भासेन यांचाही मोठा वाटा आहे. हर्षा यांनी यशचा अभ्यास घेतला. ‘त्याला कोणत्याही विषयाची भीती निर्माण होणार नाही, याकडं मी लक्ष दिलं,’ असं हर्षा यांनी स्पष्ट केलं. तर, जास्त मार्क मिळाले पाहिजेत अशी कोणतीही सक्ती आम्ही यशवर केली नाही, असं त्याचे वडील मनीष भासेन यांनी केली. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश दहावीच्या परीक्षेत देशात पहिला आला. या परीक्षेसाछी ‘घोकंपट्टी न करता संकल्पना स्पष्ट करा,’ असा महत्त्वाचा सल्ला त्यानं यंदा दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांना दिला आहे.