मुंबई, 15 जुलै : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात अनेक लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहे. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासोबतच्या चर्चा त्या क्लिपमध्ये आहे. याबाबत गिरीष महाजन यांनी टिव्ही9 ला दिलेल्या माहितीनुसार फडणवीसांनी कोरोनाची लागण झाल्यास सरकारी रुग्णालयात भरती करण्याच आवाहन गिरीष महाजन यांना केलं आहे. या संभाषणात फडणणीस म्हणतायेत की – मला कोरोनाची लागण झाल्यास सरकारी रुग्णालयातच दाखल करा. खासगी रुग्णालये भरमसाठ बिलं आकारत आहेत. सर्वसामान्य जनता सरकारी रुग्णालयात भर्ती होते, त्यामुळे मलाही मुंबईतील सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात भर्ती करा. अन्यथा जनतेचा आपल्यावर विश्वास राहणार नाही. या यंत्रणेवर लोकांचा विश्वास वाढायला हवा यासाठी त्यांनी गिरीष महाजनांकडे फडणवीसांनी अशी मागणी केली.
यावर महाजन म्हणाले – गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनासंदर्भात आम्ही राज्यभरात फिरत आहोत. यामध्ये अनेक रुग्णालयात सर्वसामान्य जनतेला नीट उपचार मिळत नसल्याचे चित्र होते. अशा प्रसंगी मोठे पुढारी खासगी रुग्णालयात भरती होत आहे. त्यावेळी फडणवीस मला म्हणाले की मला काही झालं तर मला सरकारी रुग्णालयातच भरती करा. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता अनेक भागांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. रुग्णसंख्येवर हे नियंत्रण आणण्यासाठी हे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

)







