हिंगोली, 12 एप्रिल : हिंगोली जिल्ह्यात एका बडतर्फ एसटी चालक (ST Driver) कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल रात्री वसमत शहरात घडली. स्वतःच्या घरात खिडकीला गळफास घेत या एसटी कर्मचाऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. अशोक दगडू कळंबे असे या आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट - हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे एका बडतर्फ एसटी चालकाने काल रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अशोक दगडू कळंबे असे या मृताचे नाव असून ते वसमत आगारामध्ये चालक म्हणून कार्यरत होते. मागील जानेवारी महिन्यापासून ते सेवेतून बडतर्फ होते. वसमत शहरातील वर्धमान कॉलनी भागात काल रात्री नऊच्या सुमारास त्यांनी गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या आत्महत्येचे कारण सध्या अस्पष्ट असून वसमत शहर पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. हेही वाचा - शरद पवारांच्या Silver Oak घरावर हल्ल्यापूर्वी फोन केलेला नागपुरातील तो व्यक्ती कोण? परळच्या एसटी डेपोमध्येही आढळला होता मृतदेह - एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास स्थानाबाहेर गोंधळ (ST Employees protest outside Sharad Pawar residence) घातल्यामुळे आंदोलनाला गालबोट लागले. आझाद मैदानावर आंदोलक बाहेर पडले आहे. यानंतरच, सायन हॉस्पिटलमध्ये (Sion Hospital) एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. परळच्या एसटी डेपोजवळ या कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला होता. तर आझाद मैदानातून चार कर्मचारी बेपत्ता असल्याचा आरोप काही एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. महेश लोले असं एस टी कर्मचाऱ्याचे नाव आहे. महेश लोले एसटी कंडक्टर होते. परळ एसटी आगारजवळ लोले यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. लोले यांचा आंदोलकांशी संबंध आहे की नाही, याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांची खंत - एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही वेळोवेळी सांगत होतो. तुम्ही सर्व कर्मचारी आपले आहात. तुम्ही कारण नसताना कोणत्याही व्यक्तीच्या चिथावणीखोर भाषणाला, चुकीच्या सल्ल्याला बळी पडू नका, ते तुम्हाला अडचणीत आणतील. मात्र कर्मचारी त्यांच्या मागण्यांवर ठाम राहिल्याने अखेर प्रकरण न्यायालयात गेले, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.