रायगड, 16 फेब्रुवारी: ‘लिंगाण्याचा डोंगूर आभाळी गेला’ हे गाणं आपण यापूर्वी ऐकलं असेलच. या आभाळी गेलेल्या डोंगरावर चढाई करण्यासाठी धडधाकट लोकंही धजावत नाहीत. मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील दाढ गावातील चैतन्य कुलकर्णी नावाच्या एका अपंग युवकाने या दुर्गम डोंगरी किल्ल्यावर यशस्वी चढाई केली आहे. विशेष म्हणजे चैतन्यचे दोन्ही पाय अपंग असून तो काठीचा आधार घेतल्याशिवाय उभाही राहू शकत नाही. दोन्ही पायाने अपंग असलेल्या या तरूणाने लिंगाणा किल्ल्यावर यशस्वी चढाई केली आहे. चैतन्य विश्वास कुलकर्णी हा 2014 साली 60 फूट नारळाच्या झाडावरून पडला होता. ज्यामध्ये त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते. तेव्हापासून त्याला दोन काठ्यांचा आधार घेतल्याशिवाय पाऊलही टाकता येत नाही. अशा परिस्थितीतही चैतन्यने खडतर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्रातील सर्वोच्च असलेलं कळसूबाई शिखर तीन वेळा सर केलं आहे.
याव्यतिरिक्त त्याने हिमालयातील बर्फाच्छादित असणाऱ्या नेगी ड्युग शिखरावरही यशस्वी चढाई केली आहे. आता त्याने लिंगाणा किल्ल्यावर चढण्याचा पराक्रम केला आहे. इच्छाशक्ती असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे चैतन्यने वारंवार सिद्ध केलं आहे. कंबरेखालचा भाग निकामी झाल्याने त्याला अवघड सुळक्यावर चढाई करण्यात अनेक अडचणी येत होत्या. असं असताना त्याने लिंगाणा डोंगरावरील शिखरावरची गुहा गाठत भारताचा तिरंगा ध्वज फडकवत विक्रम केला आहे.
लिंगाणा ट्रेक करण्यासाठी चैतन्य महाराष्ट्रातील अनेक वेगवेगळ्या ग्रुप लीडर एडवेंचर्सला भेटत होता. परंतु त्याच्या पायाची परिस्थिती बघून व चैतन्याच्या पायाचं शून्य टक्के संतुलन पाहून ट्रेक करण्यासाठी अनेक ग्रुप लीडर त्याला नकार देत असत. परंतु बारामतीतील अनिल वाघ, अमोल बोरकर आणि संदीप कसबे यांच्या ग्रुपने चैतन्याला ही संधी दिली. ज्याचं चैतन्यनं सोनं केलं आहे. त्याने सह्याद्री पर्वतरांगेतील अवघड असलेला लिंगाणा गड सर करण्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी सुरूवात केली होती. त्याने एक दिवस अवघड चढाई केल्यानंतर मध्येच एक मुक्काम ठोकला.
त्यानंतर 13 तारखेला दुसऱ्या दिवशी पुन्हा गडाची अवघड चढाई सुरू केली. त्याने 13 तारखेला सकाळी लवकर उठून पाच तासात लिंगाणा शिखराची गुहा सर करण्यात यश मिळवलं. त्यानंतर उन्हाच्या तडाख्यामुळे चैतन्याला पुढील ट्रेक करणं अशक्य वाटत होतं. त्यामुळे चैतन्याने गुहा सर केल्यानंतर तिरंगा झेंडा फडकावून उत्सव साजरा केला. त्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्याचं हे धाडस सर्वांसाठीच प्रेरणा देणारं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.