उस्मानाबाद, 17 ऑगस्ट : आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांनी आपले जीव गमावल्याच्या घटना आजवर घडल्या असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यातून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. कोरोनाबाधित असणाऱ्या प्रेग्नेंट महिलेची दुसऱ्या वेळी सिझेरियन प्रसूती करून बाळंतपण करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलं आहे. महिला आणि बाळही सुखरूप असल्याने आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर व कर्मचारी यांचे जिल्हाभर कौतुक होत आहे. लोहारा तालुक्यातील कोरोनाबाधित महिला ही उस्मानाबादमधील स्त्री रुग्णालयात दाखल झाली. तिचे नऊ महिने भरत आले असतानाच तिला रुग्णालयात दाखल केले. पण महिलेचं या अगोदरचे बाळंतपण सिझेरियन प्रसूती करूनच करण्यात आले होते. त्यात महिलेला कोरोना असल्याने डॉक्टर व महिलेची खूप मोठी अडचण झाली होती. दरम्यान, यावर मार्ग काढत जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या टीमने काही खासगी डॉक्टरांना सोबत घेत खासगी रुग्णालयातच या महिलेवर सिझेरियन प्रसूती यशस्वीपणे केली. विशेष म्हणजे या बाधित मातेचे बाळ कोरोनामुक्त असून कोरोना बाधिताची ही जिल्ह्यातीलच पहिलीच प्रसूती आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन देशमुख यांनी याबाबत सांगितले की, मुरूम येथील कोरोना बाधित महिला प्रसूतीसाठी आली. तिची यापूर्वी एक सिझेरियन प्रसूती झाली असल्याने ही प्रसूती गुंतागुंतीची होती. जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डात तिला दाखल करण्यात आले. याही वेळी तिची सिझेरियन प्रसूती करणे आवश्यक असल्याचे निदान डॉक्टरांनी केले; पण त्यासाठी अतिदक्षता विभागाची गरज पडणार असल्याचे लक्षात आले. दरम्यान, सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या प्रसूतीची सुविधा आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये करण्यात आली आहे. पण, या रुग्णालयात सध्या शस्त्रक्रिया कक्ष कार्यान्वित नाही. त्यामुळे या महिलेच्या प्रसूतीसाठी तिला शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या हॉस्पिटलची यंत्रणा वापरून जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या पथकाने ही गुंतागुंती प्रसूती यशस्वी केली विशेष काळजी घेतण्याने बाळ कोरोनाच्या संसर्गापासून दूर आहे. प्रकृती उत्तम प्रसूतीदरम्यान आईची प्रकृती बिघडी होती. दरम्यान, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या पथकाने विशेष काळजी घेतली. प्रसूती होईपर्यंत डॉ. देशमुख उपस्थित होते. आता बाळ आणि आईची प्रकृती उत्तम असून, बाळाचे वजन 2 किलो 70 ग्रॅम आहे. या सगळ्या परिस्थितीकडे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय पाटील लक्ष ठेवून होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.