मुंबई, 12 जून: आयारामांना सामावण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. 14 जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याआधी आयारामांना सामावण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त फडणवीस सरकारनं काढला आहे. त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान राधाकृष्ण यांच्यासोबत सुजय विखेही होते.
विखे यांच्यासोबत काँग्रेसमधले त्यांचे काही समर्थक आमदारही भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना कसं सामवून घ्यायचं, पुढती रणनीती काय असेल? अशा सगळ्या मुद्यांची बैठकीत चर्चा झाल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीतून सेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांची नावं आघाडीवर आहेत, सोबतच भाजप आमदार प्रशांत बंब, अतुल सावे यांच्या नावाची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आणखी एक जोरदार धक्का देण्याच्या तयारीत मुख्यमंत्री आहेत अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे. तो धक्का काय असेल याची उत्सुकता मात्र सर्वांना आहे.