वीरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी सोलापूर, 3 एप्रिल : गेल्या महिन्यामध्ये कांदे आणि कोथिंबिरचे भाव गडगडल्याने शेतकरी अक्षरश: रडकुंडीस आला होता. मात्र, आता कांदा आणि कोथिंबीर नंतर कलिंगडाचाही दर कोसळला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथील रामभाऊ रोडगे या शेतकऱ्याला तीन क्विंटल कलिंगड विक्रीनंतर अवघे 3400 रुपये मिळाले आहेत. हा दर म्हणजे 80 पैसे प्रति किलो दराने असून यामुळे पदरमोड 4560 रुपये खर्च करून घरी परतावे लागले आहे.
रामभाऊ रोडगे यांची तीन एकर शेती असून यात त्यांनी दोन एकरावर कलिंगडची लागवड केली आहे. त्यांना यासाठी एक लाख 20 हजार रुपयांचा खर्च आला आहे. दरम्यान, यातील तीन टन कलिंगड विक्रीसाठी सोलापूर बाजार समितीत आणले होते. हे तीन टन कलिंगड काढण्यासाठी मजुरी अडीच हजार रुपये, गाडी भाडे साडे चार हजार रुपये, हमाली 960 रुपये, असा एकूण त्यांना सात हजार 960 रुपये खर्च आला. या कलिंगडची पट्टी मात्र 3400 रुपये झाली. त्यामुळे उत्पादन खर्च तर मिळालाच नाही. उलट नुकसान सोसून घरी परतावे लागले. कांदा आणि कोथिंबीर नंतर कलिंगडाचाही दर कोसळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी राजा संकटात सापडला आहे.